पन्नास टक्क्य़ांहून अधिक लागवडीची कामे पूर्ण
पालघर : पालघर जिल्ह्यत पन्नास टक्केहून अधिक भात लागवड पूर्ण झाली आहे. सध्या पाऊस मुसळधार पडत असला तरी हा पाऊस भातशेतीसाठी पूरक पाऊस असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. हा पाऊस किमान आठवडाभर सरसरीत पडला तर रोपे उगवायला पूरक वातावरण तयार होणार आहे.
पालघर जिल्ह्यत ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर या खरीप हंगामात लागवड केली जाते. यामध्ये भात क्षेत्राचे प्रमाण मोठे आहे. तर नागली, तूर, उडीद अशी कडधान्य पिकेही डोंगराळ भागात घेतली जात आहेत. जिल्ह्यत भात हे प्रमुख अन्न असल्यामुळे विविध ठिकाणी भात लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. किनारपट्टी भागासह पठारी व डोंगराळ भागात वेगवेगळ्या मातीच्या प्रकारानुसार हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन पद्धतीची भातशेती केली जाते. पालघर जिल्ह्यत सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र वाडा, पालघर व डहानु तालुक्यातील आहे.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात जोरदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांची भात पेरणीच्या रोपवाटिकेसाठी लगबग सुरू झाली होती. त्यानंतर पाऊस पडला नसल्यामुळे काही काळ शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र त्यानंतर जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पावसाला सुरू झाल्याने जिल्ह्यत बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर पुन्हा पावसाने उसंत घेतली. मात्र गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला व जिल्हाभर भात लागवडीला सुरुवात झाली. आतापर्यंत पालघर जिल्ह्यतील आठ तालुक्यांमध्ये ७५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. तर उर्वरित लागवड करण्याची लगबग जिल्हाभर सुरू आहे. लागवड करण्यासाठी आवश्यक असलेला सरासरी पाऊस जिल्ह्यत पडल्याने भात शेतीचे सध्यातरी कोणतेही नुकसान होणार नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या लागवडी खोळंबल्या होत्या, त्यांना या पावसामुळे लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात जिल्ह्यतील सर्व शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या लागवडी पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. भात शेती साठी आवश्यक असलेला हा पाऊस पुढील सात दिवस तरी कायम राहिल्यास भाताला चांगला बहर येईल असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.