पालघर : बोईसर येथील पीयूष चौधरी या तरुणाने भारतातील हजारो नागरिकांना मदत होणारे २५ हून अधिक अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन्स तयार केले असून विनामूल्य असणाऱ्या त्याच्या या सेवेचे कोट्यवधी नागरिकांनी लाभ घेत आहेत.

पीयूष याने बोईसरमधील टीव्हीएम येथे शालेय शिक्षण व पालघर येथील सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून बॅचलर अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर त्याने मुंबईतील अथर्व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. शिक्षण घेत असताना पीयूषला अँड्रॉइड अ‍ॅप बनवण्याची आवड निर्माण झाली होती. छंद म्हणून सुरू झालेले हे अ‍ॅप नागरिकांच्या पसंतीस पडू लागले होते.

पीयूष यांनी तयार केलेल्या अ‍ॅप पैकी त्याचे एसटी बस टाइम टेबल महाराष्ट्र हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप ठरले आहे. या अ‍ॅपद्वारे लोकांना बसचे वेळापत्रक सहजपणे तपासण्यास मदत करते आणि ते १० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. इतर यशस्वी अ‍ॅप मध्ये स्वामी समर्थ नित्यसेवा, हरियाणा रोडवेज टाइमटेबल व इतर अ‍ॅप यांचा समावेश आहे. हे दोन्हीही अ‍ॅप एक लाख हुन अधिक डाउनलोड करण्यात आले आहेत.

पीयूष यांनी नवनाथ पोथी, मनुस्मृती, मल्हारी महात्म्य, स्वामी चरित्र सारामृत आणि तुकाराम गाथा यांसारखे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक अ‍ॅप देखील तयार केले आहेत. ज्यापैकी अनेक अ‍ॅप प्रत्येकी १०,००० हून अधिक डाउनलोड झाले आहेत. प्रादेशिक भाषांमधील आध्यात्मिक सामग्री शोधणाऱ्या लोकांकडून हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पियुषचे अ‍ॅप सोपे, उपयुक्त आणि वास्तविक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणारे असून त्यापैकी बहुतेक अ‍ॅप लहान शहरे आणि खेड्यांमधील वापरकर्त्यांसाठी आखणी करण्यात आले आहेत. आपल्याला असणारा छंद लोकांच्या उपयोगी यावा या दृष्टीने बोईसर येथील तरुण अ‍ॅप डेव्हलपरने भारतातील हजारो लोकांना मदत करणारे मोबाइल अ‍ॅप्स बनवल्याने त्याच्या कामाबद्दल दखल घेतली जात आहे.