पालघर : केंद्र शासनाच्या उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात २०२३-२४ दरम्यान १६३९४ तर २०२४-२५ दरम्यान २३ हजार ५७७ नवसाक्षरांची नोंद उल्हास ॲपवर झाली आहे. पुढील दोन महिन्यात होणाऱ्या नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी करिता नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत १३६९ नवसाक्षरांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील नवसाक्षरांनी पुढे येऊन जिल्हा साक्षर करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.
पालघर जिल्ह्याची १०० टक्के साक्षरतेकडे वाटचाल घडवण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रमास सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रीय सहभाग द्यावा याकरिता जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय नियामक समिती व कार्यकारी समितीची संयुक्त बैठक २ जुलै रोजी पार पडली. शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२७ पर्यंत पालघर जिल्हा १०० टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केंद्रशासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
२०२३-२४ मध्ये पालघर जिल्ह्यातून १६३९४ परीक्षार्थी होते तर २०२४-२५ मध्ये जवळपास दुपटीने २३५७७ नवसाक्षरांनी परीक्षा दिली. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग अधिक असून अपंग देखील या परीक्षेत सहभागी झाले होते.
गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या या परीक्षेकरिता नवसाक्षरांमध्ये १५ वर्षाहून अधिक वयाच्या मंडळींसोबत आजी आजोबा सुद्धा मोठ्या आत्मविश्वासाने आणि शिकण्याची नवी उमेद घेऊन या परीक्षेला बसले होते. वर्षातून दोन वेळा घेण्यात येत असून यंदाची परीक्षा सप्टेंबर मध्ये घेण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, स्वयंसेवी संस्था व तरुण मंडळांच्या सहकार्याने गावोगावी सर्वेक्षण करून असाक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी ‘उल्लास’ ॲपवर करण्यात येत आहे. त्यानुसार साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
एका स्वयंसेवकाकडे १० निरक्षर व्यक्ती
शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सर्वे करून गावातील साक्षर किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांची स्वयंसेवक म्हणून उल्लास ॲपवर नोंदणी केली. यातून प्रत्येक स्वयंसेवकाला १५ वर्षांपेक्षा मोठे १० निरक्षर व्यक्ती निवडून देण्यात आले. पायाभूत साक्षरता वाचन, लेखन व संख्याज्ञान विकसित करून जीवन कौशल्य विकसित करण्याची जबाबदारी त्या स्वयंसेवकांवर सोपविण्यात आली आहे.
याकरिता प्रत्येक स्वयंसेवकाला वाचन, लेखन व गणित क्रियेसाठी उल्लास ॲपवर चार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाद्वारे उल्लास ॲपवर परीक्षेच्या वेळेपर्यंत आलेल्या परीक्षार्थींना नोंदणी करून परीक्षेला बसविण्यात आले. २०२३-२४ मध्ये २३९४ स्वयंसेवक, २०२४-२५ मध्ये २७१८ तर यंदा १३६९ स्वयंसेवक नोंदणी झाली आहे.
मागील दोन वर्षांत सुमारे ४०,००० असाक्षरांना केवळ लेखन-वाचनच नव्हे, तर आर्थिक, आरोग्य, डिजिटल साक्षरता आणि जीवनकौशल्याचे शिक्षण देण्यात आले आहे. गावपातळीवर प्रत्येक घटकाने पुढाकार घेतल्यास जिल्हा साक्षरतेच्या दिशेने मोठी झेप घेऊ शकेल. – शेषराव बडे, शिक्षणाधिकारी (योजना)