बोईसर : पालघर जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असली तरी जून महिन्यात झालेल्या जास्तीच्या पावसाने बहुतांश धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. हवामान विभागाकडून पुढील एक दोन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाची  शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जुलै महिना बहुतांश कोरडा गेला असून पाच वर्षातील सर्वात कमी निचांकी पावसाची नोंद झाली तर ओगस्ट महिन्यात देखील तुरळक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. एक-दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिली असली तरी जून महिन्यात झालेल्या दमदार  पावसाने जिल्ह्यातील धामणी, कवडास, वांद्री, कुर्झे, वाघ, डोमहिरा ही धरणे आणि मनोर, माहीम केळवा,रायतळी, देवखोप, खांड, मोहखुर्द  लघू पाट बंधारे तुडुंब भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.  पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर धरणामधील पाण्याचा विसर्ग पुन्हा बंद करण्यात येऊन पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धामणी धरणामध्ये सध्या ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून वांद्री ८९ टक्के, कुर्झे ७४ टक्के, वाघ धरणात ९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून इतर लहाने बंधारे १०० टक्के भरले आहेत. जिल्ह्यात जून पासून आत्तापर्यत फक्त १२५७ मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या फक्त ८०.९%  पाऊस झाला आहे. धामणी धरणातून विसर्ग करण्यात येणारे पाणी कवडास बंधारयात साठवणूक करून पुढे सूर्या नदीत सोडण्यात येते. या पाण्यावर डहाणू व पालघर नगरपरिषद, वसई-विरार महानगरपालिका, तारापूर एमआयडीसी, तारापूर अणुउर्जा प्रकल्प, बीएआरसी, अदानी पॉवर यासारखे मोठे प्रकल्प, आस्थापना आणि स्थानिक स्वराज्य संस्था अवलंबून आहेत.
 

पावसाच्या दडीने शेती धोक्यात येण्याची शक्यता :

जिल्ह्यात पावसाच्या दडीमुळे डोंगर उतारावर  आणि वरच्या भागात लागवड केलेल्या हळव्या भाताची शेती कोरडी पडू लागली असून जमिनीतील पावसाचा ओलावा कमी होत आल्याने डोंगराळ भागातील भातपिके करपू लागली आहेत. भातावर करपा, तुडतुड्या, खोडकिडा आणि बगळ्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. शेतकरी रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र भाताच्या जोमदार वाढीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.