राज्यभर राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमात पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या अगोदर पालघर पोलीस दलाने राज्यात प्रथम तर आता क्रीडा विभागाने तृतीय क्रमांक पटकावून पालघर आदिवासी जिल्ह्याला राज्यात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
पालघर जिल्हा आदिवासी बहुत जिल्हा आहे. जिल्ह्यातील आदिवासी खेळाडूंना पुढे आणण्याकरता डहाणू व जव्हार प्रोजेक्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट चाचणीचे अजून करण्यात आले एकूण ३८ हजार विद्यार्थ्यांचे आयोजन चाचणी झाली. यामधून ३२०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. एम्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आश्रम शाळांना २० हजार रुपयांचे क्रीडा साहित्य देण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याभरात मैदानी क्रीडा प्रकाराची निवड चाचणी घेण्यात आली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर अंतर्गत आठ तालुके येतात व आठ तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलाची निर्मितीचा मानस जिल्ह्याच्या ठिकाणी २५ कोटी रुपये खर्चून जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती सुरू असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा इथे निर्माण करण्यात येत आहेत. सन २०२२-२३ मध्ये पालघर जिल्ह्याचे शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग हा केवळ २२ हजार होता. तर २०२३-२४ मध्ये ३८ हजार झाला व सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षांमध्ये तो वाढून जवळपास ६५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले.
आदिवासी जिल्हा व नवीन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडा विभागाने तिसऱ्या क्रमांक पटकावून क्रीडा क्षेत्रात राज्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात नेमलेले तालुका क्रीडा केंद्रप्रमुख तसेच सर्व क्रीडा शिक्षक यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे आपल्या तालुक्यामध्ये आपापल्या शाळांमध्ये राबवली व आपल्या शाळेचा सहभाग वाढवून पालघर जिल्ह्याच्या खेळामधील असणारे नाव मोठे केले असल्याचे समाधान जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने यांनी व्यक्त केले.
पालघर जिल्ह्यामध्ये आज तागायत राज्यस्तरीय क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल स्केटिंग इत्यादी स्पर्धा आयोजनाचा मान मिळालेला आहे. तसेच पालघर जिल्ह्यामध्ये व्हॉलीबॉल व स्केटिंग या राष्ट्रीय स्पर्धा शिबिरांचं आयोजन देखील करण्याचा बहुमान पालघर जिल्ह्याला मिळाला होता.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खेळाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक आणून त्यांना प्रशिक्षित करणार आहोत. अद्ययावत जिल्हा क्रीडा संकुल उभे राहत आहे. २०३२ च्या ऑलिम्पिक मध्ये आपला खेळाडू खेळेल या दृष्टीने यापुढे आमचे प्रयत्न असणार आहेत. – डॉ. इंदुराणी जाखड, अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हाधिकारी पालघर
पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने व नव्याने निर्मिती झालेला जिल्हा असल्याने पालघर जिल्ह्यामधील खेळाडूंना व शिक्षकांना १०० दिवसाच्या कार्यक्रमाद्वारे मिळालेला बहुमान आहे तो 100 टक्के प्रोत्साहित करणारा असेल. श्वास क्रीड़ा, ध्यास क्रीड़ा या उक्ति प्रमाणे आदिवासी जिल्ह्यातुन ओलिम्पिक खेळाडू नक्की घडतील. – सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी