पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रातील गटारे व नाले सफाईची कामे उशिराने सुरू झाली असून 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र वळीवाचा पाऊस सुरू होण्याची शक्यता असताना अद्याप पर्यंत नाले व गटारीची सफाई पूर्ण झाली नसल्याने पुढील आठवडाभरात नालेसफाई पूर्ण व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
पालघर जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महावितरण विभागाकडून जवळपास कामे पूर्ण होत आली आहेत. मात्र स्वच्छतेच्या दृष्टीने गटार व नालेसफाई आतापर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र जेसीबी व पोकलेन उपलब्ध नसल्याने नालेसफाईला विलंब झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून या अगोदर सांगण्यात आले होते. असे असताना मे महिन्याच्या मध्यावर सुरू केलेली ही कामे काही प्रमाणातच पूर्ण झाली असून अधिकतर नालेसफाई बाकी असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वळीवाच्या पावसाला आता सर्वत्र सुरुवात झाली असून पालघर मध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहेत. त्या दृष्टीने पाऊस कधीही कोसळू शकतो अशी शक्यता असताना पाणी तुंबल्याने आपत्कालीन परिस्थिती ओढवू शकते. याकरिता नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने जलद गतीने नालेसफाई पूर्ण करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे
या कामासाठी तीन पोकलेन मागवण्यात आली असून उपलब्ध झालेल्या दोन पोकलेन द्वारे सफाईची कामे सुरू आहेत. काम जलद गतीने होण्यासाठी तीन पोकलेनची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तीन जेसीबी पाच डंपर व 20 माणसे या कामासाठी नेमण्यात आल्याचे नगर परिषदे कडून सांगण्यात आले आहे.
पूर्वेकडे अद्याप दुर्लक्ष
पालघर नगर परिषदेकडून पश्चिम रेल्वेच्या रुळाच्या बाजूला असलेले नाले साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र पूर्वेकडील घोलवीरा भागातील वेऊर येथून वाहत येणारा व देवखोप शेलवाली मार्गे जाणाऱ्या घोलविरा येथील नाल्याच्या उत्तरेकडील संरक्षण भिंतीचे काम सुरू होते. संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून नाल्याच्या सपाटीकरण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नाल्याच्या दक्षिणेकडील गाळ काढण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.