पालघर : गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या पालघर पूर्व येथील स्मशानभूमी लगत असलेल्या बालोद्यानातील खेळणीची दुरावस्था झाली असून पावसाळ्या दरम्यान या भागात साचलेल्या कचऱ्यामुळे इथे कोणीही मुले खेळण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे हे साहित्य आता इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेणे आवश्यक आहे.

पालघर पूर्व येथे स्मशानभूमीच्या बाजूला लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली होती. नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विकास विभागाने दीड ते दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्प राबवला होता. मात्र ज्या ठिकाणी मुलांची वस्ती कमी आहे, अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते आणि समोरच स्मशानभूमी आहे, अशा ठिकाणी हे बालोद्यान उभारणे कितपत योग्य होते, असा प्रश्न सुरुवातीपासूनच उपस्थित होत होता. त्यामुळे येथे एकही मूल खेळताना दिसले नाही आणि लाखो रुपयांची ही खेळणी केवळ धूळ खात पडून राहिली. नागरिकांनी यावर खर्च झालेला निधी वाया गेल्याचा आरोप केला होता.

दुसरीकडे पालघर पश्चिमेकडील भगिनी समाज विद्यालयासमोर असलेल्या बालोद्यानात मुलांसाठी खेळणी अपुरी आहेत. या बाल उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन खेळण्याकरिता व फिरण्याकरिता येत असतात. मात्र येथील काही खेळणी तुटलेली असून, येथे नवीन साहित्य बसवण्याची आणि दुरुस्ती करण्याची गरज होती. एका ठिकाणी साहित्य पडून असताना दुसऱ्या ठिकाणी त्याची गरज आहे, हे चित्र स्थानिक नागरिकांना अस्वस्थ करत आहे.

या प्रकरणी पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे त्यांच्याशी संपर्क केला असता “महिला व बालकल्याण विकास विभागाकडून ही कामे झाली होती. या संदर्भात आवश्यक चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच पालघर पूर्व येथील चांगल्या स्थितीत असलेले साहित्य आवश्यक ठिकाणी हलवले जाईल. भगिनी समाज विद्यालयाजवळील बालोद्यानातील तुटलेले साहित्य दुरुस्त करण्याचे कामही लवकरच सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर परिषदेच्या या निर्णयामुळे योग्य ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर होईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. हा निर्णय केवळ एका बालोद्यानापुरता मर्यादित नसून, भविष्यात कोणतीही विकास कामे करताना योग्य नियोजन आणि जनतेच्या गरजांचा विचार केला जाईल, असा विश्वास जनतेला वाटत आहे.

नागरिकांचा आरोप

पालघरमधील सार्वजनिक कामांच्या नियोजनातील त्रुटी आणि निधीचा योग्य वापर न केल्यामुळे अनेक विकासकामे वाया जात असल्याचा आरोप नागरिक करत आहे. मुलांना खेळासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे महत्त्वाचे विकास काम असताना देखील प्रशासनाकडून अशा गोष्टी दुर्लक्षित होत असल्याने लाखो रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोप देखील नागरिक करीत आहे.