पालघर : अकरावी इयत्तेसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशाची पहिली विशेष फेरी ११ ऑगस्ट रोजी संपली असून अंतिम व अखेरच्या विशेष प्रवेश फेरीला आजपासून (ता १२) आरंभ झाला आहे. प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना तसेचपुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ही अखेरची संधी असून पालघर जिल्ह्यातील किमान १४ विद्यार्थी अजूनपर्यंत अकरावी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे दिसून आले आहे.
अकरावी प्रवेशाच्या नियमित फेऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसलेली विशेष प्रवेश फेरी राज्य सरकारने हाती घेतली होती. यामध्ये नवीन नोंदणी अर्जांमध्ये दुरुस्ती करणे, पुरवणी परिषद उत्तीर्ण झालेल्याने नव्याने अर्ज भरणे यासाठी ४ व ५ ऑगस्ट रोजी अर्ज भरावयाचे होते. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी दिलेल्या महाविद्यालयांच्या अग्रक्रमाच्या व रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार ११ ऑगस्ट रोजी या सर्वांसाठी खुल्या प्रवेश फेरी संपली आहे.
या विशेष फेरीनंतर पालघर जिल्ह्यातील ३५ हजर ०३९ विद्यार्थ्यांनी ११ वी मध्ये प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. पालघर जिल्ह्यात ६० हजार ६८० विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले असले तरीही त्यापैकी फक्त ४८ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी अकरावी इयत्ते साठी ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी केली होती. या नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील पहिला भाग यशस्वीपणे भरला असून दोन्ही भाग यशस्वीपणे भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार ७१६ इतकी आहे. शाळांत परीक्षा उत्तीर्ण होऊन ११ वे प्रवेश प्रक्रियेची पूर्ण आणि यशस्वी नोंदणी न करणराऱ्यांची संख्या १२ हजार पेक्षा अधिक असून त्यापैकी काहींनी पदविका व आयटीआय मध्ये प्रवेश घेतला असल्याची शक्यता आहे. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ७१.५७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून उर्वरित विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंतिम विशेष फेरी बाबत तपशील
यापूर्वी झालेल्या विशेष फेरी प्रमाणेच अखेरच्या विशेष प्रवेश फेरी चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात २१८ विद्यार्थ्यांनी दहावी इयत्तेची फेरपरीक्षा उत्तीर्ण झाली असून त्यांच्यासह यापूर्वी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच भाग एक मध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १३ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी विविध महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या रिक्त जागांचा तपशील पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येणार असून १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान नवीन नोंदणी दुरुस्ती विशेष फेरी मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्राधान्य कमानुसार महाविद्यालयाचे अग्रक्रम द्यावयाचा आहे. प्रवेशासाठी दिलेल्या अग्रक्रम व जागेच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दर्शविण्याऱ्या महाविद्यालय निहाय १९ ऑगस्ट रोजी प्रवेश यादी प्रसिद्ध केल्यानंतर २० ऑगस्ट च्या सायंकाळ पूर्वी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीच मुभा राहणार आहे असे पालघरच्या शिक्षण विभागाने कळविले आहे.