पालघर : राज्य सरकारने मद्यावरील उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ केल्याच्या निषेधार्थ पालघरमधील परमिट रूम, बार आणि रेस्टॉरंट्सच्या चालक-मालकांनी आज एक दिवसीय बंद पुकारला. या आंदोलनामुळे पालघर शहरातील सर्व परवानाधारक हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत.

शासनाच्या तिजोरीत लाडकी बहीण योजनेस पुरेसा निधी उपलब्ध नसल्याकारणाने परमिट रुम बार अँड रेस्टॉरन्ट मध्ये अल्कोहोलिक व्हिस्की बारच्या ६० टक्के उत्पादन शुल्कात वाढ करुन आम्हा महाराष्ट्रातील सर्व “परमिट रूम बार अँड रेस्टॉरन्ट चालक व मालकांचा बळी दिला जात असल्याचा आरोप करत पालघर हॉटेल असोसिएशनन सरकारच्या या मद्य धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत हुतात्मा स्तंभ परिसरात आंदोलन केले.

आम्ही बंदचा हा निर्णय “आहार” अर्थात इंडीयन होटेलस अँड रेस्टॉरन्ट असोसिएशनच्या आव्हानानुसार करीत नसून आमच्यावर अन्यायकारक असल्याने एक दिवसीय बंद करीत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या आंदोलनात पालघरमधील हॉटेल असोसिएशनचे नितांत चव्हाण, सतीश शेट्टी, गिरीश शेट्टी, मंगेश अवस्थी, सिद्धेश शेट्टी, अभिषेक शेट्टी, कौशिक शेट्टी, प्रवीण शेट्टी, मॅक्सि डिसल्वा, रमेश पुजारी यांच्यासह हॉटेलमधील स्वयंपाकगृह आणि सेवा पुरवणारे वेटर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारच्या या जुलमी निर्णयामुळे चालक-मालकांचा व्यवसाय बळी घेतला जात असून, हे शुल्क त्वरित कमी करण्याची मागणी त्यांनी केली. आधीच परवाना नूतनीकरणावेळी भरले जाणारे शुल्क भरमसाठ वाढल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यात आता ६० टक्के शुल्कवाढ झाल्याने ग्राहकांना मद्य महाग होईल आणि ग्राहक कमी होतील, अशी भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दरवाढीचा फटका केवळ हॉटेल मालकांनाच नाही, तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांवरही बसणार आहे. ग्राहक कमी झाल्यास काम करणाऱ्या नोकरदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल आणि ते उपासमारीच्या खाईत लोटले जातील, अशी चिंता साई सुरुची रेसिडेन्सी हॉटेलमधील नीरज वर्मा आणि प्रतीक बार रेस्टॉरंटमधील गौतम लालदेबा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही नोकरदारांनी जायचे कुठे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.