पालघर : रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ४६ बंद करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या नवली रेल्वे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून या पुलावरील तेराव्या गाळ्याचे काँक्रिटीकरण उद्या (शनिवारी) केले जाणार आहे. काँक्रिटीकरणाचे मजबूतीकरण तसेच पुलालगतच्या भागात कठड्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील ८- १० दिवसात या पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे.

विरार सुरत रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग अर्थात फाटका ऐवजी ७८८.८६ मीटर लांबी पूल बांधण्यासाठी बांधकाम करण्याचे रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. त्यापैकी १०८ मीटर लांबीचे काम रेल्वे विभागाकडून करण्यात आली असून ६८०.८६ मीटर दुपदरी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सार्वजनिक बांधकाम करून केले जात आहे.

पालघर येथे साईडिंग साठी चौथ्या मार्गीकेची आखणी रेल्वे व्यवस्थापनाने उशिराने केल्याने या उड्डाणपूलाच्या आराखड्यात बदल करण्यात आला होता. त्यामुळे पुलाचे काही खांबांची रचना बदलण्यात आली होती. पुलाच्या १३ गाळ्या पैकी १२ गाळ्यांचे काम पूर्ण झाले होते. अखेरचा गर्डर ची उभारणी करून त्यामध्ये काँक्रिटी करण्याच्या दृष्टीने स्टील बांधणी करण्यास स्टीलची उपलब्धता व पावसाचा अडथळा निर्माण झाला होता. या गर्डर मध्ये काँक्रिटीकरण करण्याचे काम उद्या शनिवारी हाती घेण्यात येणार असून उभारलेल्या पुलाच्या भागात कठले बनवण्याचे काम देखील प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

या पुलाच्या दुतर्फा असणाऱ्या पोहोच रस्त्यांच्या डांबरीकरणचे काम पूर्ण झाले असून नव्याने उभारलेल्या चार गाळ्यांचे डांबरीकरण पावसाने उघडीत घेतल्यानंतर पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान काँक्रिटीकरणाचे मजबुतीकरण (क्युरिंग) काळ संपल्यानंतर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात विलंब झालेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पोपट चव्हाण यांनी लोकसत्ताला सांगितले.

पुलाच्या उभारणीतील महत्त्वाचे टप्पे

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवली येथील रेल्वे फाटक बंद केल्यानंतर त्यावर ११ एप्रिल रोजी स्टीलचा बो- स्टिंग गर्डर बसविण्यात आला. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेने नेमलेल्या ठेकेदारामार्फत प्रलंबित असलेल्या एका खांबाची (पिलर) उभारणी करण्यात आली. रेल्वेच्या ठेकेदारामार्फत त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने पूर्वेकडील दोन गर्डर व पश्चिमेकडील एक गर्डर स्पॅन उभारण्याचे काम हाती घेतले.

या उंभारणी प्रक्रियेतील पूर्वेकडील एक स्पॅन २९ मे रोजी उभारण्यात येऊन त्यावर गर्डर कास्टिंगचे काम २३ जून रोजी पूर्ण करण्यात आले. पूर्वेकडील दुसरे गर्डर तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून हा गर्डर १४- १५ ऑगस्ट दरम्यान या पुलावर बसविलेल्यात उर्वरित गेर्डर लगत जोडण्यात आला. हे गर्डर उभारताना (लॉन्च करताना) सुरक्षिततेच्या दृष्टीने नवली जुन्या फटका कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. या ३० मीटर लांबीचा गर्डर उभारणी झाल्यावर त्यावर स्लॅब टाकण्याचे काम ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हाती घेणे अपेक्षित होते मात्र अनेक कारणांनी विलंब झाल्याने सप्टेंबर चा दुसरा आठवडा उजाडला.

तत्पूर्वी पश्चिमेकडील गर्डरचे काम पुलाच्या लगतच्या भागात उंचावर करण्यात आले असून त्याचे कास्टिंग व स्लॅब टाकण्याचे काम २० जुलै रोजी पूर्ण करण्यात आले.

महत्त्वाची जोडणी करणार पूल

नवली येथील रेल्वे फाटक ऐवजी उभारण्यात येणाऱ्या पुलावरून सिडको औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण आहे. पालघर पूर्वेकडील नवली, वेवूर, वरखुंटी, कमारे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पूर्व – पश्चिम जोडणी करण्यासाठी या पुलाचे महत्त्व आहे. या पुलामुळे सुमारे १० हजार विद्यार्थी, कामगार, कर्मचारी व नागरिकांच्या दळणवळणासाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.