डहाणू : पालघर जिल्ह्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सरावली उपकेंद्रात गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजित शासकीय शिबिर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या शिबिरात १३ ‘हाय रिस्क’ गरोदर महिलांची तपासणी न करता केवळ लसीकरणावर बोळवण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, दर मंगळवारी उपकेंद्रांमध्ये गरोदर माता तपासणी शिबिरे घेणे बंधनकारक आहे. यामध्ये डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांची उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, सरावली उपकेंद्रावर डॉक्टर आणि समुदाय आरोग्य अधिकारी गैरहजेर असून केवळ सहाय्यक परीचारिका आणि आशा ताई उपस्थित असून शिबिर पार पाडण्यात आले आहे.
स्थानिक आशा ताईंनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या म्हणण्यानुसार, नियुक्त डॉक्टर १५ ते २० दिवसांतून केवळ काही तासांसाठी कार्यक्षेत्रात येतात. उपकेंद्रात नियमित येऊन गरोदर माता आणि इतर रुग्णांची तपासणी करणे ही त्यांची जबाबदारी असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. अश्यात रुग्णांच्या आरोग्याच्या बाबतीत काही घटना घडल्यास सर्वस्वी आशा ताईंना जबाबदार धरले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मंगळवारी उपकेंद्रात तपासणी शिबिर सुरू असताना याची जबाबदारी असणारे नियुक्त डॉक्टर हे त्यांच्या खासगी दवाखान्यात सेवा देताना व्हिडीओ फूटेजद्वारे दिसून आले आहेत. सरकारी सेवेचा पगार घेत असतानाही खासगी प्रॅक्टिसवर भर देणे ही जनतेची फसवणूक असून, त्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या संपूर्ण प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषी डॉक्टरांवर निलंबन अथवा बडतर्फीची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
आरोग्य शिबिरात गरोदर मातांची तपासणी करून लसीकरण केले जाते. यावेळी प्रशिक्षित डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र डॉक्टर उपकेंद्रात वेळेवर येत नसून कामात हलगर्जीपणा करत असल्यामुळे याचे गंभीर परिणाम रुग्णांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काही घडल्यास सर्वप्रथम आशा ताईंना जबाबदार धरले जाते. – नीतू गाहला, आशा ताई
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सरावली उपकेंद्रातील प्रकार गंभीर आहे. तक्रारदारांनी दिलेल्या उरव्यावरून डॉक्टरांकडून हलगर्जी पणा होत असल्याचे निदर्शनात येत आहे. याविषयी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी करून अहवाल पुढील कारवाई साठी वरिष्ठ स्तरावर पाठवण्याची सूचना दिली आहे. – पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी, डहाणू