पालघर: राज्य परिवहन महामंडळाच्या श्रावण पॅकेज टूरच्या अनुषंगाने पालघर एसटी विभागाने उत्पन्न वाढीसाठी पहिल्यांदाच विशेषतः श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पॅकेज टूरचे आयोजन केले आहे. या टूर वसई, नालासोपारा, अर्नाळा, पालघर आणि बोईसर येथून त्र्यंबकेश्वरसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून याच ठिकाणांहून भीमाशंकर दर्शनासाठीही बसेस सोडण्यात येणार आहेत.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पॅकेज टूरमधून राज्यात चांगला महसूल मिळाला आहे. त्यादृष्टीने पालघर विभागाने कमी गर्दीच्या हंगामात विशेषतः पावसाळ्यात आणि सणासुदीच्या काळात उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने पॅकेज टूरच्या आयोजनावर भर दिला आहे. यासंदर्भात पालघर विभागातील पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर, नालासोपारा या सर्व आगार व्यवस्थापकांना विभाग नियंत्रकांनी विशेष सूचना दिल्या आहेत.
आषाढी एकादशी दरम्यान पंढरपूर यात्रेला भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता श्रावण महिन्याच्या संकष्ट चतुर्थीनिमित्त ११, १२ व १३ ऑगस्ट २०२५ रोजी पालघर येथून अष्टविनायक दर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. याकरिता प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षण तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालघर विभागाच्या या उपक्रमांमुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच भाविकांना धार्मिक स्थळांना भेटी देणे सोयीचे होणार आहे. आगार पातळीवर पॅकेज टूरचे नियोजन करण्यास यापूर्वीच कळविण्यात आले होते, मात्र अद्याप कोणत्याही आगाराकडून याबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या नियोजनामुळे पालघर विभागातील राज्य परिवहनच्या उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांना विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणे अधिक सोयीचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी आषाढी एकादशीनिमित्त पालघर विभागामार्फत ८२ बसेसच्या पॅकेज टूरचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ज्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या यशातूनच प्रेरणा घेऊन श्रावण महिन्यात अष्टविनायक व ज्योतिर्लिंग दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशी संघटनांनी किंवा ग्रुपने त्यांच्या सोयीनुसार बसेसची मागणी केल्यास, त्यानुसार बसेस पुरवण्याची व्यवस्था केली जाईल. – कैलास पाटील, विभाग नियंत्रक
टूर साठी उपाययोजना
पॅकेज टूर यशस्वी करण्यासाठी आणि अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसस्थानकांवरील दर्शनी ठिकाणी प्रवाशांसाठी पॅकेज टूरची सविस्तर माहिती प्रदर्शित करावी, बसस्थानकांवर संगणकीय उद्घोषणा, जाहीरातीद्वारे प्रसिद्धी, ग्रामीण संपर्क अभियान, फ्लेक्स बॅनर, प्रवासी सुविधा नियोजन या उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:
उत्पन्न वाढीसाठी टूरचा आधार
कमी गर्दीच्या हंगामात विशेषतः पावसाळ्यात विविध मान्सून पर्यटन स्थळे, श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंग दर्शन, साडेतीन शक्तिपीठे, पंढरपूर दर्शन, तुळजापूर-अक्कलकोट दर्शन, थंड हवेची ठिकाणे, अष्टविनायक दर्शन अशा विविध पॅकेज टूरचे नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. अशा टूरमुळे राज्य परिवहनच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
अष्टविनायक दर्शन
खोपोली, पाली, महड, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, सिद्धटेक, मोरगाव, थेऊर व परतीचा मार्ग
नाशिक दर्शन
त्रंबकेश्वर, वणी, सप्तशृंगी गड, रेणुकामाता मंदिर, शिर्डी, नाशिक दर्शन, जव्हार राजवाडा व परतीचा मार्ग
आगार व शुल्क
- नालासोपारा ते अष्टविनायक दर्शन – ११४७
- पालघर ते अष्टविनायक – १२५७
- वसई ते अष्टविनायक – ११४७
- अर्नाळा ते अष्टविनायक – १२०७
- पालघर ते नाशिक दर्शन – ११६७
- वसई ते नाशिक दर्शन – ११६७
- बोईसर ते नाशिक दर्शन – ११४७
- जव्हार ते नाशिक दर्शन – ९४६
- डहाणू ते नाशिक दर्शन – १०९६