पालघर : पालघर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज नव्याने काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून यामध्ये अनुसूचित जमाती स्त्री, नागरिक मागास प्रवर्ग (स्त्री) व सर्वसाधारण (स्त्री) या प्रवर्गात एकंदरीत २५ महिलांना जागा निश्चित करण्यात आले आहेत.
बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसीलदार यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार एकूण ४७ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जमाती (स्त्री) प्रवर्गात शिल्टे (पाल) ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे. नागरिक मागास प्रवर्गासाठी १३ जागा निश्चित करण्यात आल्या असून यात ७ महिलांसाठी तर ६ सर्वसाधारणसाठी आहेत. तसेच सर्वसाधारण प्रवर्गात २५ महिलांसाठी आणि १६ खुल्या जागांसाठी सरपंचपदे आरक्षित करण्यात आली आहेत.
ही सोडत तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, पालघर यांच्या कार्यालयातील सभागृहात मा. उपविभागीय अधिकारी, पालघर विभाग यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडली. यापूर्वी ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या २२ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली होती.
४७ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित, प्रमुख वर्गवारी
अनुसूचित जमाती (स्त्री) प्रवर्ग :
बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने यादी तयार करण्यात आली. सर्वाधिक ९५.५४ टक्के अनुसूचित जमाती लोकसंख्येची टक्केवारी असल्याने शिल्टे (पाल) ही ग्रामपंचायत अनुसूचित जमाती (स्त्री) राखीव सरपंचपदासाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आरक्षित करण्यात आली आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग :
पालघर तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण १३ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
ए) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी सात ग्रामपंचायती समाविष्ट आहेत. यामध्ये मायखोप, सरावली, सालवड, तिघरे आंबोडे, कोरे, आगरवाडी, चटाळे
ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी सहा ग्रामपंचायती आरक्षित आहेत. यामध्ये, भादवे, मधुकर नगर, पंचाळी, नवापूर, सातपाटी, खारडी
dसर्वसाधारण प्रवर्ग:
एकूण ३३ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यापैकी १७ ग्रामपंचायती सर्वसाधारण (स्त्री) तर उर्वरित १६ ग्रामपंचायती सर्वसाधारण (खुला) या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.
ए) सर्वसाधारण (स्त्री) सरपंच पदासाठी १७ ग्रामपंचायती आरक्षित आहेत. यामध्ये मागील आरक्षण वेळी महिला सरपंच पद आरक्षित नसलेल्या १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोलवडे, आलेवाडी, दापोली, केळवा, कोळगाव, उमरोळी, मोरेकुरण, विराथन खुर्द, कुंभवली, दातिवरे, खारेकुरण, खैरापाडा, नांदगाव तर्फे तारापूर, एडवण, वेढी मांजुर्ली, शिरगाव, मांडे या 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ब) सर्वसाधारण (खुला) सरपंच पदासाठी आरक्षित १६ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये वाकसई, कांद्रेभुरे, उसरणी, टेंभी, डोंगरे, जलसार, पाम, विराथन बुद्रुक, नगावे, विळंगी, मथाणे, धनसार, माहीम, दांडा खटाळी, मुरबे, टेंभीखोडावे या 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या आरक्षण सोडतीमुळे पालघर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.