पालघर : पालघर नगरपरिषदेने ना फेरीवाल्या क्षेत्रात बसणाऱ्या विविध प्रकारच्या विक्रेतांविरुद्ध कारवाई बंद केल्यानंतर शहरातील पदपथ व रस्त्यालगत फेरीवाल्याने आपले साम्राज्य पुन्हा थाटले आहे. एकीकडे वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंग झोन मध्ये सातत्यपूर्ण कारवाई होत असताना नगरपरिषदेने अतिक्रमण विरुद्ध कारवाई करण्यास दुर्लक्ष केल्याने पादचऱ्यांना रस्त्यावरून चालल्यास पूर्ववत त्रास होऊ लागला आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पालघर रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ महिन्याच्या आरंभी बैठकीचे आयोजन करून नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल तसेच पंचायत समिती अधिकाऱ्यांना बोलवून पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने पालघर पोलीस व नगर परिषदेत ना फेरीवाला क्षेत्र तसेच नो पार्किंग झोन संदर्भात अधिसूचना प्रकाशित करून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू केली होती. त्यामुळे पालघर शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता.

दरम्यान पालघरचे तत्कालीन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची बदली झाल्याने प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला असून नगरपरिषदेचे कर्मचारी वर्षअखेरी असणाऱ्या घरपट्टी व अन्य वसुलीच्या कामात व्यस्त राहिल्याने अतिक्रमण विरुद्ध कारवाई थांबली. नवीन आर्थिक वर्षात मर्यादित मनुष्यबळ व कामाची व्याप्ती ही कारणे पुढे करून अतिक्रमण विरुद्ध कारवाई बंद राहिली आहे. परिणामी मनोर व माहीम रोड या ठिकाणी बेसुमार होकर्स, फळभाजी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते व अन्य विक्रेत्याने रस्ते तसेच पदपथ बळकावले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून अतिक्रमणविरुद्ध कारवाई हा दिखाव मर्यादित राहिल्याचे दिसून आले आहे.

माहीम रोड धोकादायक

माहीम रोडवर आयसीआयसीआय बँक ते हॉटेल साई रेसिडेन्सी या दीड किलोमीटर पट्ट्याचा दुभाजक बसवण्यात आले असून सुमारे सात मीटर रुंदीच्या रस्त्यांचा एक तृतीयांश भाग सायंकाळच्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रेत्यांकडून तसेच ते खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे व्यापला जात आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अवघ्या चार मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध होत असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अंतर्गत रस्स्त्यांवर पुन्हा अवैध पार्किंग

मुख्य रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना विरुद्ध पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने अनेक दुचाकी चालक त्यांची वाहने अंतर्गत रस्त्यांवर पार्किंग करताना दिसून येतात. यामुळे त्या ठिकाणच्या असणाऱ्या रहिवाशांना व व्यापारी असस्थापनांना गैरसोय होत असून या विषयी पोलीस अधीक्षक यांचा कडे तक्रार केल्यानंतर काही दिवस अंतर्गत रस्ते मोकळे होण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र रेल्वे स्टेशन परिसरात अंतर्गत रस्ते पुन्हा दुचाकी पार्किंग ने व्यापले गेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगरपरिषद लवकरच कारवाई करणार

नागरपरिषदेकडे मनुष्यबलाची मर्यादा असल्याने काही काळ अतिक्रमण विरुद्ध कारवाई करण्यात आली न्हवती. रस्त्यावर बसणाऱ्या हॉकर, फेरीवाले व इतर विक्रेत्यांविरुद्ध लवकरच कारवाई सुरु करून अशी कारवाई निरंतर सूर ठेवण्यात येईल. – उद्देश काटकर, नगर अभियंता, पालघर