पालघर : पालघर शहराचा विकास आराखडा मंजूर करताना शहरात वाहणारे नैसर्गिक ओहळ व नाले यांचा नकाशात अंतर्भाव न झाल्याने त्याचा गैरफायदा घेऊन लगतचे जमीन मालक, विकासक यांच्यामार्फत नाल्याला संरक्षक भिंत उभारून अरुंद करण्याचा घाट हाती घेतला आहे. याकडे नगरपरिषद तसेच नगररचना विभागाकडून दुर्लक्ष होत असून आगामी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालघर नगर परिषदेच्या प्रारूप विकास आराखड्याला आरंभी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. सहा सात वर्षांच्या संघर्षानंतर त्यामध्ये काही सुधारणा करून २०१९ मध्ये पालघर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मात्र या प्रारूप आराखड्यात शहरातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक नाल्यांचा समावेश नसल्याचे नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या नजरेतून सुटल्याने अंतिम आराखड्यात नैसर्गिक ओहळ, नाले यांचा समावेश झाला नव्हता.
हीच बाब लक्षात घेऊन पालघर शहरातील काही विकासकांनी तसेच ओहोळा लगत असणाऱ्या जागा मालकांनी संधीचा लाभ घेऊन नाल्याच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण सुरू केले आहे. संरक्षक भिंत उभारण्याचे कारण सांगून अथवा नैसर्गिक नाल्याचे मातीचे कठळे कोसळत असल्याचे कारण पुढे करून नाल्यालगत बांधकाम केले जात आहे. अशावेळी नाल्यांचे पूर्वीचे आकारमान लक्षात न घेता ते लहान केले जात असल्याने आगामी पावसात शहरात विविध ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
मोरी, साकव यांची रुंदी दुर्लक्षित
अनेक वर्षांपासून पालघर शहरातील रस्त्यांवर मोऱ्या उभारण्यात आल्या असून त्यांची सर्वसाधारण रुंदी आठ ते १० मीटर इतकी आहे. असे असताना नाल्यांची रुंदी एक ते चार मीटर इतकी राखली जात असल्याने अशा अरुंद नाल्यांमधून पावसाच्या पाण्याचा निचरा होणे कठीण होणार आहे. या बाबींकडे नगरपरिषदेचे बांधकाम व नगर रचना विभागांकडून दुर्लक्ष होत असल्याने या कृत्रिमरीत्या निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीला नगरपरिषद जबाबदार राहील असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
संभाव्य पुराची ठिकाणे
पालघर पूर्वेकडील गणेश नगर भागातून येणारा नाला राष्ट्रीय महामार्ग ओलांडल्यानंतर अचानक कमी होत असल्याने वीरेंद्र नगर, गणेश नगर व परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लगत वाहणारा नाला अरुंद झाल्याने पालघर शहराचा बायपास मार्ग तसेच वृंदावन पार्क, साईनगर परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.
पाहणी करून कारवाई करू
शहरातील नैसर्गिक नाल्यांच्या रुंदीमध्ये जाणीवपूर्वक कमी आणण्याच्या प्रयत्नबाबत नगर परिषदेचे नगररचनाकार अजय संखे तसेच बांधकाम अभियंता उद्देश काटकर यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात आपल्या विभागाकडे तक्रारी आल्या असून पाहणी करून नैसर्गिक नाल्याच्या रुंदीमध्ये बदल केला जात असल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करून नाला पूर्ववत करून असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.