पालघर : प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने पालघर शहरात प्लास्टिक बंदी कालावधी सुरू असून नगर परिषदेने दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असताना कचऱ्याच्या ढिगारांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे तर अनेक दुकानदार छुप्या मार्गाने प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कारवाईची दुकानदारांमध्ये भीती कमी झाल्याचे पाहायला मिळते.
पालकमंत्र्यांनी घोषित केलेल्या प्लास्टिक मुक्त पालघर जिल्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नगरपरिषद व ग्रामपंचायत क्षेत्रात तसेच समुद्रकिनारी प्लास्टिक बंदी वर कठोर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये सुरू केलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीची कडक अंमलबजावणी सर्वत्र सुरू असून विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू तसेच ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली होती. त्या अनुषंगाने पालघर नगरपरिषद क्षेत्रात या अगोदर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून दुकानदार, हॉटेल व्यवसायीक किंवा फेरीवाले यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला होता.
पालघर नगरपरिषदेच्या प्लास्टिक बंदी निर्मुलन पथकामार्फत ८ मे ते १५ मे या आठ दिवसाच्या कालावधीत मोहिम राबवुन कांदा बटाटा व्यापारी, पालघर भाजी मार्केट, फरसाण मार्ट, किराणा स्टोअर्स, बेकर्स व इतर किरकोळ विक्रेते यांचेकडुन एकुण १६१.४५१ किलो सिंगल युज प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक ग्लास जप्त करण्यांत आले असुन त्यांचेकडुन पन्नास हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
या अगोदर देखील नगरपरिषदेकडून अनेक वेळा तात्पुरती स्वरूपाची कारवाई राबविण्यात आल्यामुळे दुकानदार वर्गांमध्ये त्यांचे भय आता दिसून येत नाही. कारवाई कालावधी नंतर बाजार परिसरात व दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांची विक्री सर्रास होत असून पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. अशाच प्लास्टिक पिशव्यांची रास रस्त्याच्या कडेला पडलेल्या दैनंदिन कचऱ्यामध्ये पहायला मिळाल्याने प्लास्टिक बंदीच्या कारवाईवर व प्रशासनाने राबविलेल्या प्लास्टिक मुक्त पालघरच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे होते.
नगर परिषदे कडून २०२३ सालामध्ये करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान ७६ आस्थापनांमधून फक्त साडे २७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला असून यामधून १३७८० रुपये दंड आकारण्यात आला होता. अशीच कारवाई २०२४ मध्ये देखील राबविण्यात आली होती. काही काळाने ही कारवाई थंडावली असून आता पालघर शहरात सर्वच दुकानदार, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, मासे विक्रेते, हॉटेल व्यवसायीक व अन्य व्यावसायिक हे सर्रासपणे व उघडपणे प्लास्टिकचा वापर करत असून ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या सहजपणे दिल्या जात आहेत.
नगरपरिषदेतर्फे आवाहन
नागरीक, व्यापारी, मच्छी विक्रेते, फळ, फुल विक्रेते, भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक व इतर किरकोळ विक्रेते यांनी सिंगल युज प्लास्टिक चा उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी व साठवणुक टाळावे. अन्यथा तसे आढळुन आल्यास पहिला गुन्हा ५००० रुपये दंड, दुसरा गुन्हा १० हजार रुपये दंड, तिसरा गुन्हा २५ हजार रुपये दंड अधिक ३ महिने कारावास बाबतची कारवाई नगरपरिषदेमार्फत करण्यात येईल असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर देखील प्लास्टिकचा वापर
प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी असणाऱ्या दुकानदारांकडून प्लास्टिक पाकिटामध्ये मिळणारा खाऊ तसेच प्लास्टिक पिशव्या मध्ये वस्तू देण्यास पूर्णपणे बंद करण्याच्या व शक्य झाल्यास कागदी पिशव्यांमध्ये देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रशासकीय अधिकारी व समुद्रकिनारी विक्री करणाऱ्या दुकानदारांना दिल्या. मात्र असे असताना समुद्रकिनारी देखील हे नियम धाब्यावर बसल्याचे दिसून येत आहे.