पालघर: कोकण मराठी साहित्य परिषदेने पालघर येथे आयोजित केलेल्या सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात काव्य संमेलनाला राज्य व राज्याबाहेरील कवयित्रींकडून उत्तम प्रतिसाद लाभला. ‘माझी कविता, माझी सखी’ या खुल्या काव्य संमेलनात दोन्हीही दिवशी सहा तासांहून अधिक काळ कवितांची मैफल सुरू राहिली. ११० पेक्षा अधिक कवयित्रींनी आपला सहभाग नोंदवला.
‘उमलते शब्द’ या सत्राचे आयोजन ११ जून रोजी आदिवासींच्या ताई समाजसेविका मालकी राऊत व्यासपीठावर सादर करण्यात आल्या. हे सत्र डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. साहित्यिका प्रज्ञा मराठी, नमिता कीर, अनुराधा नेरुरकर यांच्यासह कोकणातील कवयित्रींनी कविता सादर केल्या. महाविद्यालयातील गणेश नीलकंठ दांडेकर सभागृहात आयोजित ‘स्वर्गीय सुनंदाताई देशमुख कवयित्री कट्टा’ या ठिकाणी ‘माझी कविता, माझी सखी’ या अंतर्गत आयोजित काव्य मैफली उत्साहात पार पडल्या. या कवी कट्टय़ाचे अध्यक्षपद हेमांगी नेरकर व मेघना साने यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून आमदार डॉ. मनीषा कायंदे, प्रमुख अतिथी ॲड. सुनीता जोशी, गझलनंदा सुनंदा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रज्ञा मराठे उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना साहित्यिका प्रज्ञा मराठे यांनी आपण कविता नाही तर कवयित्रीचे मन वाचायला येतो. कवितेलादेखील रियाज असतो असे स्पष्ट करत त्यांनी कवितेच्या सादरीकरण शैलीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या काव्य संमेलनात मध्य प्रदेश, गोवा, गुजरात राज्यांतून तसेच कोकणातील विविध भागांतील कवयित्री सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संध्या शहापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक शीतल संखे, नम्रता माळी पाटील, मधुमती कुलकर्णी, नेत्रा राऊत, अस्मिता पंडित, प्रीती भोईर, स्वाती भोईर, हर्षां पाटील, शिल्पा पै-परुळेकर, रेखा बागुल यांनी नियोजन केले. कविता सादरीकरणानंतर सहभागी कवयित्रींना अध्यक्षांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
खेडय़ा-पाडय़ातील रचना ऐकण्याचा अनुभव
सुख-दु:ख, निसर्ग, स्त्रीच्या व्यथा, कौटुंबिक कथा, साहसी कहाण्या तसेच अनुभव विश्वावर अवलंबून शहरी व ग्रामीण भागांतील कवयित्रींचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. विशेषत: ग्रामीण व डोंगरी भागातील अनेक कवयित्रींनी आपल्या कविता चालीसह सादर केल्या. या कविसंमेलनात खेडय़ापाडय़ातील रचना शहरी भागातून आलेल्या कवयित्रींना ऐकावयास मिळाल्या तर काही तरुणींनी आधुनिकता व तंत्रज्ञानावर आधारित कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनासाठी १९२ महिलांनी नोंदणी केली होती, मात्र पाऊस असल्याने प्रत्यक्षात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित राहिली.