पालघर पोलिसांनी वडराई येथील अनैतिक मानवी व्यापारावर मोठी कारवाई केली असून या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात अवैद्य धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर येथील पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १४ जुलै रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला. १४ जुलै रोजी दुपारी ३.४० वाजता पालघर येथील वडराई येथील एका रिसॉर्टवर ही कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलिसांकडून डमी ग्राहक बनवून संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले. यावेळी पल्लवी सुनील अहिरे (४७), अजय हरिश्चंद्र इंदुलकर ( ५९, रिसॉर्ट चालक, वडराई) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे दोघे आरोपी दोन पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून, पुरुष ग्राहकांना पुरवून त्यातून मिळणारी कमाई स्वतःच्या उपजीविकेसाठी वापरत होते.
याप्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) करत आहेत.
या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सावंतदेसाई, रवींद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, तसेच पोलीस हवालदार दीपक राऊत, नरेंद्र पाटील, संदीप सरदार, भगवान आव्हाड, कपिल नेमाडे, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, पोलीस अंमलदार विशाल लोहार, बजरंग अमनवाड, नरेश घाटाळ, विशाल नांगरे आणि महिला पोलीस नाईक मनाली शितप, सपना गडग यांचा समावेश होता. पालघर पोलिसांनी अवैध धंद्यांवर केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातून गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल आणि पीडित महिलांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.