स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाडा : तालुक्यातील मौजे तोरणे येथे असलेल्या शिव कृपा स्टील अॅन्ड अॅलॉईज या लोखंड उत्पादक कंपनीकडून केल्या जाणाऱ्या ध्वनी, वायू व जल प्रदूषणाने येथील शेतकरी, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. याबाबत अनेकदा प्रदूषण नियंत्रण विभाग, पालघर जिल्हाधिकारी, स्थानिक तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने या तक्रारींकडे गांभीर्याने न पाहिल्याने येथील शिव कृपा स्टील कंपनीची मुजोरी सुरूच आहे.
कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक ग्रामपंचायतीकडून परवानगी न घेताच कंपनी विस्तारासाठी माती भरावाचे काम सुरू केले आहे. या माती भरावामुळे कंपनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत पावसाळय़ात भरावाची माती वाहून येऊन शेतजमिनींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कंपनीलगत राहत असलेले यशवंत भेरे या वयोवृद्ध शेतकऱ्याचे व त्यांच्या कुटुंबीयांचे येथील प्रदूषणामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे.
प्रशासनाने वेळीच या कंपनीमधून होणाऱ्या प्रदूषणाचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हा कुटुंबीयांना आत्मदहनासारखा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा येथील शेतकरी यशवंत भेरे यांनी दिला आहे. या कंपनीच्या त्रासाबाबत अनेकदा वाडा तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही, असे येथील यशवंत भेरे यांनी सांगितले.
कंपनी व्यवस्थापनाने सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच ही कंपनी सुरू केली आहे. कंपनीने स्थानिकांना रोजगारही दिला आहे.
– आनंद आगरवाल, कंपनी मालक
कंपनी व्यवस्थापनाने कंपनी विस्ताराचे बांधकाम करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र अजूनपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाही.
– अरुण भांड, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कुयलू, ता. वाडा.