डहाणू: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानीवरी येथील सुसरी नदीवरील गुजरात वाहिनीवरील पुलावर मोठा खड्डा पडला असून सध्या याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. तीन ते चार वर्षांपासून या पुलावर पावसाळ्यात खड्डा पडत असून तकलादू दुरुस्तीमुळे खड्डा पुन्हा पूर्ववत होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

सुसरी नदीवरील मुंबई आणि गुजरात वाहिनीवर दोन वेगवेगळे पुल तयार करण्यात आले असून दोन्ही पुलांवर पावसाळ्यात खड्डे तयार होतात. मुंबई वाहिनीवरील पुल जीर्ण झाल्यामुळे या पुलाला नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत नव्याने मजबुतीकरण करून त्यावर काँक्रीटीकरण करण्याचे काम साधारण वर्षभरापासून सुरू आहे. तर गुजरात वाहिनीवरील पुल साधारण २० वर्ष जुना असून त्याच्यावर तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्यात खड्डे पाडण्याचे प्रकार समोर येत आहेत. सध्या भगदाड पडलेल्या ठिकाणी यापूर्वी ही खड्डे पडले असून त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. आता दोन ते तीन दिवसांपासून येथे दीड ते दोन फूट लांब खड्डा पडला होता. त्याची दुरुस्ती करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार असून दोन ते तीन दिवसात खड्डा बुजवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

सुसरी नदीवरील दोन्ही वाहिन्यांवर पुलांची पावसाळ्यात दयनीय अवस्था होत असल्यामुळे याठिकाणी नवीन पुलांसाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दुरुस्ती केली तरी दुरुस्ती तग धरणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी तीव्र उतार -चढाव असल्यामुळे वाहनांचे वेग कमी जात होत असल्यामुळे पुलावर खड्डे जिर असून यासाठी पुलाची क्षमता वाढवण्यासाठी जुन्या पुलांच्या जागी नवीन पुलांची उभारणी करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे.

सुसरी नदीवरील मुंबई वाहिनीवर सध्या एका मर्गिकेचे काँक्रीटीकरण साधारण तीन महिन्यांपासून सुरू असून आता गुजरात वाहिनीवर खड्डा पडल्यामुळे दुरुस्तीमुळे दोन मार्गिका बंद ठेवण्यात आल्या आहेत. सततच्या अडचणींमुळे पुलांवरील वाहतूक विस्कळित होत असून अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्रशासनाकडून उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली असून स्थानिकांच्या तक्रारीनंतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सुसरी नदीवरील मुंबई वाहिनीवरील पुल १९६० आणि गुजरात वाहिनीवरील पुल २००३ दरम्यान बनवण्यात आले आहेत. या पुलांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. यामुळे पुलावर अपघात आणि वाहतूक कोंडी सारख्या समस्या निर्माण होते. महामार्ग प्रशासनाकडून येथे उपाययोजना करण्याचे प्रयत्न होत असले तरी येथे होणाऱ्या दुरुस्त्या तग धरत नाही. त्यामुळे या पुलांच्या जागी नवीन पुलांची निर्मिती होण्याची गरज धानीवरी येथील ग्रामस्थ शैलेश तांबडा यांनी व्यक्त केली.

सुसरी नदीवरील मुंबई वहिनीचा पुल जुना असला तरी त्याचे मजबुतीकरण करून त्यावर काँक्रीटीकरण करण्यात एक आहे. त्यामुळे साधारण २० ते २५ वर्ष या पुलाची अडचण होणार नाही. तसेच सध्या खड्डा पडलेल्या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे दुरुस्ती सुरू आहे. दोन ते तीन दिवसात दुरुस्ती पूर्ण होऊन रस्ता पूर्ववत होणार आहे. तसेच पावसाळ्यात याठिकाणी अडचणी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे प्रकल्प प्रबंधक सुमित कुमार यांनी दिली.