पारशी डेअरी फार्मच्या जमिनीची उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही
कासा : तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील पारशी डेअरी फार्मच्या मालकीच्या खासगी जमिनीची बुधवारी पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करण्यात आली.
यावेळी विभागीय प्रांत अधिकारी, तलासरी तहसीलदार तसेच तलासरी पोलीस निरीक्षकसह मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ३५० पोलिसांचा बंदोबस्तामध्ये पारशी डेअरी फार्मच्या या खासगी जमिनीचे भूमी अभिलेखा मार्फत मोजणी करण्यात आली.
तलासरीमधील वरवाडा येथील पारशी डेअरी फार्मच्या जमिनीची मोजणी १२ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाने होणार होती. मात्र स्थानिक कब्जेदार नागरिकांच्या विरोधामुळे मोजणी वेळी वाद झाल्याने प्रकरण हात बाहेर गेले. यावेळी जमीन मोजणी बंदोबस्तासाठी गेलेल्या तलासरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यावर राजकारण्यांच्या चिथावणीने ग्रामस्थांकडून धक्काबुक्की करत तुटपूंजी दगडफेक करण्यात आली होती. ही घटना शनिवारी एक वाजण्याच्या सुमारास वरवाडा पारसी डेरी येथे घडली या प्रकरणी ५२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यापैकी पुरुष आणि महिला असे एकूण ५२ जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा व दगड फेक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या ५२ पैकी १४ पुरुष आणि ८ महिलांना अटक ही करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. याबाबत अद्यापही ही पोलीस गुन्ह्यांतील इतरांचा शोध घेत आहेत.
बुधवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जमिनीची पोलीस बंदोबस्तामध्ये भूमी अभिलेख व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोजणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथकासह ३५० पोलीस व भूमीलेख विभागातील अधिकारी, कर्मचारी, खासगी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.