पालघर : बांधकामाच्या आरंभापासून चर्चेत असणाऱ्या नवली उड्डाणपूल कार्यरत होण्यापूर्वी पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. पुलाच्या संरक्षक भिंतींना बाह्य फुगवटा आल्याने भविष्यकाळात पुलाला धोका संभवू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पूल सुरक्षित असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.
नवली रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याचे निश्चित झाल्यानंतर पुलाच्या जागेचे भुसंपादन करताना बाधित सदनिका, भूधारकांना अपेक्षित दर न मिळाल्याने त्यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली. अनेक वर्ष या पुलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नवली, वेवूर, कमारा, वाकसई, हनुमान नगर इत्यादी भागातील नागरिकांना पूर्व-पश्चिम प्रवास करणे त्रासदायक ठरले होते.
दरम्यान पश्चिम रेल्वेने पालघर रेल्वे स्थानकात सायडिंगकरिता अतिरिक्त मार्गिका (लूप लाईन) ठेवण्याचे नंतर प्रयोजन केल्याने पुलाच्या पश्चिमेकडील एका खांबाची रचना बदलणे आवश्यक झाले. त्यामुळे जुना खांब तोडून त्याची नव्याने अभिमुकता व उभारणी करण्यात आली. या तोडकामामुळे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाबद्दल नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतरही पुलाचे काम सुरू होते.
साडेसात मीटर रुंदीच्या या पुलाच्या पूर्व व पश्चिमेच्या पोहोच मार्गाचे काम सद्या अंतिम टप्प्यात आहे. परंतु पालघर पंचायत समितीच्या बाजूला पुलाच्या संरक्षक भिंतीला फुगवटा आल्याचे दिसून येते. यामुळे पुलाच्या बाह्यभागात लावलेल्या मोठ्या आकाराच्या चौकडी पॅनेल भविष्यकाळात कोसळून पडून पुलाला धोका पोहोचेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याच्या देखील तक्रारी पुढे आल्या आहेत.
उंचीनुसार पुलाचा उतार
पुलाच्या प्रत्येक बाजूला तेथील रस्त्यांच्या तुलनेत असणाऱ्या उंचीच्या अनुसार उतार ठरलेल्या प्रमाणात (१:३०) निश्चित करण्यात येत असून त्या अनुषंगाने पूर्व व पश्चिम भागातील पोहोच रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. रेल्वे व उभारण्यात आलेल्या इतर सर्व पुलांप्रमाणे या त्याची रुंदीदेखील साडेसात मीटर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जूनअखेरीस पुलावरून वाहतुकीची शक्यता
नवली रेल्वे फाटकाच्या वरच्या भागात धनुष्य आकाराचा स्टील गर्डर बसवण्यात आला असून रेल्वेकडून एक खांब उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम महिन्याभरात पूर्ण होणे अपेक्षित असून दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका प्रलंबित तुळईचे (गर्डर) काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. मे अखेरीपर्यंत ही कामे पूर्ण झाल्यानंतर या पुलावरचा अखेरचा स्लॅब जूनच्या मध्यावर टाकण्याचे नियोजित असून त्यापूर्वी व सोबत डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे काँक्रीट स्लॅबचे मजबुतीकरण (क्युरिंग) पूर्ण होऊन जून अखेरीपर्यंत नवली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे.
पूल मजबूत
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पुलाच्या बाह्य भागात फुगवटा आला असला तरी पुलाच्या पोहोच मार्गाची उभारणी करताना चौकोनी पॅनल बसवण्याच्या प्रक्रियेत आवश्यक खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले. पोहोच रस्त्याच्या उंचीनुसार त्यावर येणाऱ्या दाब व वजनाच्या (लोड) अनुषंगाने या पुलाची आखणी (डिझाईन) करण्यात आली आहे. पॅनलच्या बाहेर या भागात कोणत्याही प्रकारे मातीची अथवा पाण्याची गळती होणार नाही असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पोपट चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हा पूल पूर्णपणे मजबूत असून पुलाचे काम योग्य देखरेखीखाली पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.