scorecardresearch

वाणगाव रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा

वाणगाव रेल्वे फाटकांत सकाळ संध्याकाळ वाहनांची कोंडी होत असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

डहाणू : वाणगाव रेल्वे फाटकांत सकाळ संध्याकाळ वाहनांची कोंडी होत असून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे रेल्वे मार्ग ओलांडणे हे प्रवाशांसाठी एक संकटच होऊन बसले आहे. रेल्वे सहापदरीकरणाच्या कामात अवजड वाहनांमुळे येथील कोंडी आणखी वाढत आहे.

वाणगाव पश्चिमेस सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बाजारपेठ, बसस्थानक आहे. त्यामुळे रहिवाशी तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा रेल्वेलाइन ओलांडून पलीकडे जावे लागते. रात्रीच्या वेळेस अनेक रहिवासी जीव धोक्यात घालून रेल्वे फाटक ओलांडतात. सध्या रेल्वेमार्गाचे सहापदरीकरण सुरू आहे. त्या कामासाठी लागणारे लोखंडी साहित्य तसेच खोदकामामुळे जमा झालेले मातीचे ढिगारे नागरिकांसाठी मोठी अडचण झाले आहेत. त्यामुळेच वाणगाव रेल्वे फाटकातील उडडाणपुलाचे काम जलद गतीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

वाणगाव येथे रेल्वेमार्गाचे सहापदरीकरण सुरू असल्याने दिवसभर मातीचे अवजड ट्रक आणि इतर मोठय़ा गाडय़ांची रहदारी सुरू असते. वाणगाव रेल्वे उड्डाणपुलाचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे चिंचणी, चारोटी राज्यमार्गावर इंद्रप्रस्थ ते खडखडदरम्यान मोठी वाहतुक कोंडी होते. वाणगाव रेल्वे फाटकात दोन्ही बाजूला जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा लक्षात घेऊन ते बंद करावे लागते. तसेच रेल्वे सिग्नलचा संदेश मिळेपर्यंत वाहतुक थांबवली जाते. जे नियमाला धरूनच आहे परंतु येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हा वेळ आणखीच वाढतो. शिवाय ही कोंडी सोडवण्यासाठी अथवा येथील वाहनचालकांतील वाद मिटवण्यासाठी वाहतूक पोलीस अथवा रेल्वे पोलीसही उपस्थित नसतात. त्यामुळे ताटकळत थांबावे लागते. कधी कधी या नादात पुढील गाडय़ा जातात. इच्छित स्थळी वेळेवर पोहोचता येत नाही. वाणगाव खडखड ते इंद्रप्रस्थपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाय करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Queues vehicles vangaon railway crossing amy

ताज्या बातम्या