पर्यायी मार्ग म्हणून उड्डाणपुलाची उभारणी

नीरज राऊत

पालघर: पालघर जिल्ह्यात अस्तित्वात  असणाऱ्या रेल्वे लाइनच्या लगत समर्पित द्रुतगती  मालवाहू  मार्ग तसेच विरार-डहाणू रोड चौपदरीकरणाचे काम सुरू आहे तसेच विरार ते संजानदरम्यान असणाऱ्या २३ रेल्वे फाटक (क्रॉसिंग) करिता पर्यायी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही सर्व रेल्वे फाटक कालबाह्य ठरणार आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही रेल्वे फाटक ब्रिटिशकालीन व १९०० सालापूर्वीची आहेत.

अस्तित्वात असलेल्या पश्चिम रेल्वेच्या रुळाच्या पूर्व बाजूला समर्पित द्रुतगती मालवाहू मार्ग (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर- डीएफएससी) तयार करणे सुरू आहे.  पश्चिमेच्या बाजूला विरार- डहाणू चौपदरीकरणाचे दोन रेल्वे मार्गाचे तयार करण्याचे  काम हाती घेण्यात आले आहे. द्रुतगती मालवाहू मार्गावर डबल डेकर  मालगाडय़ा धावण्याची आखणी पाहता पूर्वी आठ मीटर उंचीचे उड्डाणपूल दहा मीटर उंचीचे करणे अनिवार्य झाले आहे. या अनुषंगाने अनेक ठिकाणी नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे. विरार ते उंबरगावदरम्यान १३ पूल उभारण्याचे काम सुरू  आहे. त्यापैकी दहा पुलांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग तर उर्वरित तीन पुलांचे काम डीएफसीसी करीत आहे. वैतरणा ते डहाणू रोडदरम्यान अस्तित्वात असलेल्या रेल्वे रुळाच्या दुतर्फा भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने पूर्वी अस्तित्वात असणारी २३ रेल्वे फाटके टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहेत. यापैकी अनेक रेल्वे फाटके व सुरक्षारक्षकांसाठीची चौकी (केबिन) ब्रिटिशकाळात उभारण्यात आली असून अजूनही ती सुस्थितीत आहेत.

ब्रिटिशकालीन फाटक 

केळवे रोड ते पालघरदरम्यान रोठे येथे असणारे फाटक क्र. ४४ ब्रिटिशकालीन असून त्याची पुनर्बाधणी १८९५  मध्ये करण्यात आली होती. हे सव्वाशे वर्षांपूर्वीचे जुने असणारे हे चुना-मातीच्या बांधकामाचे फाटक अजूनही भक्कम असून कार्यरत आहे. केळवे रोड- पालघरदरम्यान नागरिकांनी उड्डाणपुलाची मागणी केली असताना या फाटकादरम्यान भुयारी रस्ता (अंडरपास) उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने या भुयारी मार्गातून पावसाळय़ात प्रवास करणे शक्य होणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोळगाव पूल एप्रिलअखेरीस

पालघर नंडोरेपासून जिल्हा मुख्यालय कार्यालय परिसराला जोडणारा कोळगाव पूल हा डिसेंबर २०२१  मध्ये कार्यरत होणे अपेक्षित होते. मात्र करोनाकाळात अनेक अडचणी निर्माण झाल्याने हा पूल उभारण्याचे काम लांबणीवर पडले आहे. एप्रिलअखेपर्यंत हा पूल कार्यरत होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येते.