वाडा : निकृष्ट दर्जाचा, वादग्रस्त आणि चर्चेत असलेल्या भिवंडी– वाडा महामार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराकडून मागील आठ महिन्यांपासून हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या एका बाजूचे काम प्रगतीपथावर चालू होते. मात्र शासनाने अपेक्षित निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वाडा – भिवंडी मार्गाचे काम थांबल्याने हा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गेली १२ वर्षापासून भिवंडी- वाडा – मनोर महामार्ग हा खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्यांमधून प्रवास करताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आत्तापर्यंत ७५० कोटीहून अधिक खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा रस्ता पूर्णपणे कधीच सुस्थितीत झाला नसल्याने आजही या मार्गावरून मरणयातना प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यासाठी विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपने देखील रस्त्यावर उतरत आंदोलन केले. नुकतच श्रमजीवी संघटनेने रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी तब्बल १२ तास रास्ता रोको आंदोलन केले. हे सर्व होत असताना देखील रस्त्याचे विघ्न काही सुटताना दिसत नाहीत.
दरम्यान, राज्य शासनाने संबंधित कंत्राटदाराला “वाडा – भिवंडी” रस्त्याच्या सुरू असलेल्या खर्चासाठी अपेक्षित निधीच दिला नसल्याने ठेकेदार कंपनीने या रस्त्याचे काम बंद केले आहे.
निकृष्ट रस्ता, काँक्रिटीकरणाचे अपूर्ण काम, एकेरी मार्गावरून होणारी अवजड वाहतूक प्रवास जीवघेणा बनला आहे. शिवाय या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक, प्रवाशी यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
भिवंडी –वाडा –मनोर या ६४ किमी महामार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम राज्य शासनाकडून ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला ७७६ कोटींना देण्यात आले आहे. काम सुरू करताना या कंपनीला आवश्यक साधन सामुग्री (मोबीलायझेशन) उपलब्ध करण्यासाठी निविदेच्या १० टक्के रक्कम आगाऊ देणे गरजेचे होते. मात्र राज्य शासनाने संबंधित कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारची रक्कम दिली नाही.
मात्र तरीही या कंपनीने काम सुरू करत रस्त्याच्या एका बाजूची भरणी आणि जवळपास १० किमी काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी केवळ २० ते २५ कोटींच्या आसपास निधी अदा केला आहे. प्रत्यक्षात कंत्राटदाराला जवळपास ७० ते ८० कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना त्यांना ही रक्कम अदा करण्यास शासन विलंब करत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने सध्या चालू असलेले वाडा– भिवंडी महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम थांबविले आहे.
ठाणे अधिक्षक अभियंतांकडून दुजोरा
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठाणे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ह्या रस्त्याचे काम निधी अभावी थांबले असल्याचे सांगत अधिकृत दुजोरा दिला आहे.
मात्र येत्या पाच ते सात दिवसात हा निधी शासनाकडून प्राप्त होईल आणि काम प्रगतीपथावर चालू होईल. तसेच (पुढील वर्षी २०२६) पावसाळ्यापूर्वी वाडा– भिवंडी मार्ग पुर्णत्वास जाईल असे “लोकसत्ता”शी बोलताना सांगितले.
तीन वर्षात ८२ जणांचा मृत्यू
भिवंडी – वाडा- मनोर महामार्ग निकृष्ट झाल्याने सन २०२२ ते २०२५ या कालावधीत तब्बल ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
वाडा तालुक्यातील रस्त्यांची मोठी दुरवस्था
वाडा तालुक्यातील गोऱ्हे फाटा – खानिवली, खानिवली – शिरीष फाटा, वाडा – मनोर महामार्गवरील केळीचा पाडा या मुख्य अतंर्गत रस्त्यांसोबतच वाडा मनोर, वाडा – भिवंडी महामार्गाची देखील मोठी दुरवस्था व चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मोठ्या खड्ड्यात दुचाकी, लहान चारचाकी वाहने अडकली जात आहेत. वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा दुरुस्तीकरिता स्थानिकांनी तक्रारी करून देखील कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांवर गौरी – गणपती यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे “बाप्पाला” देखील खड्ड्यातूनच आणायचं का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाचे “गणपती बाप्पा”च्या आगमनापूर्वी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकडे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे.