Coordination meeting for conducting survey by CWPRS at Satpati : पालघर : पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर प्रस्तावित मुरबे-जिंदाल बंदर प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवल्याने प्रशासनात आणि मच्छिमार समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मच्छिमार समाजावर पालघर पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे.
आज सकाळी, केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (CWPRS) या संस्थेचे कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता सातपाटी किनारपट्टीवर अचानक सर्व्हे करण्यासाठी दाखल झाले. यामुळे संतप्त झालेल्या सातपाटी गावातील ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला तीव्र विरोध दर्शवला. या बंदर प्रकल्पाच्या संदर्भात अपुरे अभ्यास झाले असून जनसुनावणी चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचा मच्छिमार समाजाचा मुख्य आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाविरोधात ‘एल्गार’ पुकारला आहे.
स्थानिक मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार, CWPRS कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणाला विरोध करत असताना, सातपाटी सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी ग्रामस्थांशी शांततेने संवाद साधण्याऐवजी त्यांना धमकावले असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. ग्रामस्थांना भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेला हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर) लागू करण्याची नोटीस देण्याच्या धमक्या दिल्या, अशी गंभीर तक्रार स्थानिक मच्छिमारांनी नोंदवली आहे.
पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हा लोकशाही मार्गाने चाललेला विरोध दडपण्याचा प्रयत्न असून, ही कारवाई अलोकशाही, बेकायदेशीर आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणारी असल्याचा मच्छिमार समाजाचा आरोप आहे.
तणावानंतर उद्या संयुक्त बैठकीचा निर्णय
वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उप विभागीय पोलिस अधिकारी श्री. नाईक यांच्यासोबत सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थसमवेत आज तातडीची बैठक घेण्यात आली. मुरबा सोसायटीचे माजी मच्छीमार चेअरमन राजू चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या (सोमवार) सकाळी ११ वाजता CWPRS चे अधिकारी आणि ग्रामस्थ यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात येईल. या सभेत चर्चा झाल्यानंतरच, सातपाटी लगत समुद्रात सर्व्हे करायचा किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सातपाटी चे पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधीत सर्वेक्षणाबाबत बैठक झाली असून सध्या सर्वत्र शांतता असल्याचे त्यांनी सांगितले.
