डहाणू : तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अविनाश धोडी नंतर त्याचा साथीदार मनोज राजपूत याला शहापूर जि. ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. पाचा महिन्यांपासून अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या करून फरार झालेल्या अविनाश धोडी आणि त्याचे अन्य तीन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून प्रथम अविनाश धोडी आणि नंतर मनोज राजपूत यांना अटक करण्यात आली आहे. अद्याप दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा कडून शोध सुरू आहे.
जमिनीच्या वादावरून मनात राग धरून अविनाश धोडी याने आपला भाऊ अशोक धोडी यांचे आपल्या साथीदारांच्या मदतीने १९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास डहाणू येथून त्यांच्या घरी जात असताना वेवजी घाटातील हिलझील हॉटेल नजीकच्या डोंगराचे वळणावर अशोक धोडी यांची कार अडवून दमदाटी करून गाडीसह अशोक धोडी यांचे अपहरण केले होते. त्यानंतर अशोक थोडी यांची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व गाडी सरिगाम वाडियापाडा, उमरगाव येथील पाण्याने भरलेल्या खदानीत टाकून दिली होती.
त्यांनतर संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून तब्बल १२ दिवसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरात मधील सरिगाम येथील एका बंद दगड खदानीतील तलावात मिळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली होती. मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अटक केल्यानंतर आता मनोज राजपूत याला अटक करण्यात आली आहे.
पालघर पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पाच महिन्यांपासून या आरोपींचा शोध सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे पथकाने आरोपी याला घोलवड, उमरगांव, वापी (गुजरात) दिव दमन, सिलवासा, इंदोर, राजस्थान इत्यादी परिसरात शोध घेऊन सूत्रांच्या मार्फत माहिती मिळवून आरोपी अविनाश धोडी आणि मनोज राजपूत यांना जेरबंद केले आहे. मनोज राजपूत याला गुरुवार १२ जून रोजी डहाणू न्यालयालयात हजार करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू अंकिता कणसे करीत आहे.
या गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू अंकिता कणसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, गोरखनाथ राठोड, रोहित खोत, राजेश वाघ, सुनील नलावडे, पोलीस हवालदार दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, भगवान आव्हाड, कपिल नेमाडे, विजय ठाकूर, संजय धांगड तसेच पोलीस अंमलदार यांच्या नेमणूक शाखेने पार पाडली.
अद्याप दोघांचा शोध सुरू
अशोक धोडी हत्या प्रकरणातील एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून अजून दोन आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. उर्वरित दोन आरोपी देखील लवकरच अटक करण्यात आधी खात्री पालघर पोलिसांकडून देण्यात आली आहे.