स्वतंत्र गटाचा सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न

पालघर:  जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ सदस्यांमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या दोन सदस्यांच्या अधिकृत गटाची स्वतंत्र नोंदणी केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहा आणि काँग्रेसचा एक सदस्य अशा सात सदस्यांनी पालघर विकास आघाडी असा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व काँग्रेस हे पक्ष एकत्रित सत्तास्थानी होते. सव्वा वर्षांचा कार्यकाळ उलटल्यानंतर  पदाधिकाऱ्यांनी पक्षातील इतर सदस्यांना संधी घेण्यासाठी  पदाचे राजीनामे दिले. या अनुषंगाने २० व २२ जुलै रोजी पदाधिकाऱ्यांच्या पदासाठी निवडणुका होत आहेत.  राष्ट्रवादीकडून मिळालेल्या बांधकाम सभापती पदाचा राजीनामा देणाऱ्या काशिनाथ चौधरी यांना उपाध्यक्ष किंवा गटनेते पद दिले जाण्याची शक्यता पाहता राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेऊन गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्यासमोर ‘पालघर विकास आघाडी’ नामक गट स्थापन केला. त्याला राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष यांचे समर्थन लाभले नाही.  राष्ट्रवादीचे काशिनाथ चौधरी व सुनिता धूम यांनी  पक्षाचे समर्थ असलेला अधिकृत गट स्थापन केला.

राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांच्या विरोधात असलेल्या नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. पालघर विकास आघाडी या गटाला कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडीचे समर्थन मिळावे तसेच भाजपने बाहेरून समर्थन द्यावे किंवा तटस्थ भूमिका घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा अध्यक्ष यांच्याविरोधात असणाऱ्या सर्व मंडळी एकत्र येऊन त्यांना शह देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याला पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. वाडा पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक १९ जुलै रोजी होणार आहे. अंतर्गत समझोत्यानुसार शिवसेनेकडे असलेले पद राष्ट्रवादीच्या सदस्याला देण्याचे नियोजित होते. मात्र बदललेल्या परिस्थितीचा या निवडणुकीवर परिणाम होतो का हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.  जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विष्णू कडव यांनी  पदाचा राजीनामा कोकण आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला आहे.  इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने  कडव यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार होता. त्यामुळे त्यांना  पदाचा राजीनामा  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ऐवजी कोकण आयुक्त यांच्या समक्ष द्यावा लागला.

एकत्र गट स्थापनेची प्रतीक्षा

पालघर विकास आघाडी नामक गट स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादीतर्फे स्थापन होणाऱ्या गटामध्ये सर्व सदस्यांना सामावून घ्यायचे ठरले होते. मात्र त्यामध्ये विभक्त झालेल्या गटातील मंडळींचा सहभाग न झाल्याने तसेच आगामी निवडणुकीत उपाध्यक्ष पद तसेच गटनेते पदाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्याने अधिकृत गटामध्ये फक्त दोन सदस्यांची नोंदणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस  व काँग्रेसचा नऊ सदस्य गट स्थापन करण्याचा प्रयत्न सोमवारी करण्यात येईल, असे समजते.