पालघर: पालघर-माहीम रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार उभारणीचे काम सुरू आहे. या गटाराची हद्द म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची मर्यादा नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच माहीम मार्गावर रस्त्यालगत झालेल्या अनधिकृत बांधकामावर एप्रिलच्या पहिल्या पंधरवडय़ात कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात करण्यात आले.
सागरी महामार्गाअंतर्गत पालघर शहर ते माहीमदरम्यान हा रस्ता येतो. येथे दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. पालघर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ते वागुळसापर्यंत अनेक उपाहारगृह, हॉटेल, वाहन दुरुस्तीची दुकाने, मार्बल ग्रॅनाईट विक्री करणारी दुकाने येथे रस्त्यावर थाटण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघातांना कारण ठरत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने याच भागात गटार उभारण्याचे काम सुरू केले आहे. मात्र रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही ठिकाणी वेगवेगळय़ा अंतरावर गटार उभारणी होत असल्याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गटार पुढे सरकवल्याच्या तक्रारीही येत आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याशी संपर्क साधला असता माहीम मार्गालगत झालेल्या अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आर्थिक वर्षांअखेरची कामे संपल्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. जागेच्या उपलब्धतेनुसार पावसाळी पाण्याचा निचरा होऊन रस्ता खराब होऊ नये या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा गटार उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
सध्या १२ ते १५ मीटर अंतरावर जागेच्या उपलब्धतेनुसार गटार उभारणीचे काम सुरू आहे. त्याची हद्दिभत उभारण्यासाठी रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर जागा मोकळी ठेवणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. या भागातील विकासाच्या गरजेनुसार आगामी काळात रस्तारुंदीकरण किंवा सेवा रस्त्याची उभारणी करायची ठरल्यास भूसंपादन प्रक्रिया राबवून जागा हस्तगत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या पंधरवडय़ापासून ठेकेदार व कंत्राटदारांची गर्दी आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी वर्षांअखेरीस बिले काढण्याच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे अतिक्रमणाविरुद्ध कारवाई किंवा अन्य कामांना कमी प्राधान्य दिले गेल्याचे दिसते.
ग्रामपंचायतीकडून नोटीस
माहीम ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता माहीम ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या बांधकामांना माहीम ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे. या कामी सार्वजनिक बांधकाम विभागाची समन्वय साधून कारवाई करण्यात येईल असे माहीम ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.