पालघर : जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री व इतर मंत्री येत असल्याने पालघर-बोईसर मार्गावर तसेच पालघर शहरात फलकबाजीला ऊत आला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जणू फलकयुद्ध छेडले होते. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या स्वागत करणाऱ्या फलकांवर सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात येते.
पालघर-बोईसर मार्गावर विविध खांबावर तसेच बांबूच्या कमानी उभारून संपूर्ण रस्त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागताचे मोठमोठे फलक लावले होते. इतके नव्हे तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साइन बोर्ड व सूचना फलकांवरही नेतेमंडळींचे फलक झळकत होते. २५०० रुपयांपासून ३५-४० हजार रुपयांपर्यंतचे फलक राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख रस्त्याच्या चौक, पथदिव्यांचे खांब, महावितरणच्या मालकीचे खांब तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांवर लावण्यात आल्याचे दिसून आले. फलकबाजीद्वारे मुख्यमंत्री यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी तसेच जनसामान्यांमध्ये प्रसिद्धी मिळविण्यासाठी किमान सहा लाख रुपये खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्री यांचा पालघर दौरा रद्द झाल्यामुळे फलकांवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला.