बोईसर : बोईसर तारापूर आणि परिसरातील रोजचा जमा होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करणारा संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा तिढा सुयोग्य जागेची उपलब्धता आणि नागरीकांच्या विरोधामुळे रखडला आहे. या प्रकरणी राज्याच्या लोकायुक्तासमोर सुनावणी सुरु आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रामुळे परिसरातील बोईसर, सरावली, कोलवडे, कुंभवली, पाम, सालवड, पास्थळ, खैरापाडा, बेटेगाव, मान या गावांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढत एकूण लोकसंख्या दोन लखन पेक्षा जास्त झाली आहे.  प्रचंड नागरीकरणामुळे संपूर्ण परिसरात  ६० ते ७० टन घरगुती आणि व्यावसायिक ओला आणि सुका कचरा निर्माण होत आहे.

दैनंदिन तयार होणाऱ्या  कचरा विल्हेवाटीसाठी ग्रामपंचायत स्तरावर कायमस्वरूपी जागा, पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध नसल्याने सर्व ग्रामपंचायत हद्दीत जागोजागी कचऱ्याचे ढीग तयार होऊन बकालपणा वाढत चालला असून दुर्गंधीसह नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर परिसरात संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याकरीता आवश्यक शासकीय जागा उपलब्ध नसल्याने कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

या प्रकरणी डॉक्टर सुभाष संखे यांनी बोईसर सिटीझन फोरम या संस्थेमार्फत राज्य लोकायुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आल्यानंतर वेळोवेळी आयोजित सुनावणीमध्ये जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी यांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र  गावात घनकचरा प्रकल्प नको अशी भूमिका घेऊन सर्व गावे आपापल्या हद्दीत कचराभूमीला विरोध करीत असल्याने जागे अभावी कायमस्वरूपी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचा प्रश्न रखडला आहे.

पालघर जिल्हा प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्या करिता औद्योगिक क्षेत्र परिसरानजीक चार जागांची पाहणी केली आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिकांनी दुर्गंधी आणि वायु व जलप्रदूषणाचे कारण देत आपल्या हद्दीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास विरोध केल्याने संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात अडथळा येत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात बोईसर सिटीजन फोरम या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने डॉक्टर सुभाष संखे यांनी राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. या याचिके संदर्भात २६ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडलेल्या सुनावणीत लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी सन २०२३ पासून बोईसर तारापूर येथील स घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रकरण प्रलंबित असून संबंधित विभागांकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने ही लज्जास्पद बाब असल्याचे सुनावणी करताना म्हटले.

बोईसर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसीला प्रकल्पासाठी आवश्यक निधी आणि जागा उपलब्धता यासाठी आणखी एक संधी देत असल्याचे  सांगत पुढील सुनावणीत तोडगा निघाला नाही तर याबाबत विशेष बाब म्हणून लक्ष घालण्यासाठी राज्य शासनाला विनंती करणार असल्याचे लोकायुक्तानी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोईसर तारापूर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांना चार आठवड्यांच्या आत आवश्यक ती कामे जलदगतीने करण्याचे आणि १० टक्के मोकळी जागा ठेवण्याची अट सोडवण्यासाठी आवश्यक ती शिथिलता देण्याचे लोकायुक्त यांच्याकडून निर्देश  देण्यात आले आहेत.  चार आठवड्यांच्या आत, एमआयडीसी ने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासंदर्भात केलेली मागणी मान्य करावी आणि चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश लोकायुक्त यांनी सुनावणी दिले.