कासा : पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसात हजारो हेक्टर क्षेत्रात लागवड केलेल्या भातशेतीचे नुकसान झालेले आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे अद्याप सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. जिल्ह्यामध्ये ७६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर भातशेतीची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळय़ात सातत्यपूर्ण पाऊस झाल्याने भात पिकाची वाढ समाधानकारक झाली आहे. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भात पीक तयार झाले आहे, तर काही ठिकाणी भातकापणीला सुरुवात झाली होती. मात्र काही ठिकाणी भाताचा दाणा भरण्याच्या स्थितीत परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. परतीचा पाऊस पालघर जिल्ह्यात आठवडाभरापेक्षा अधिक काळ रेंगाळल्यामुळे व अनेक ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने लागवड क्षेत्रात पाणी जमून पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.

पावसामुळे हळव्या भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान  झालेले पाहायला मिळत आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे  भात पिकाला कोंब यायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी उभे असलेले भात पीक हे आडवे झाले आहे. पावली काळी पडल्यामुळे विक्रीमध्ये मोठे नुकसान होणार आहे.  सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. हातातोंडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. वर्षभराचा धान्यसाठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुकानिहाय भात लागवड (हेक्टरमध्ये)

पालघर १५३२८.४६

वसई  ७८९१.२४

डहाणू  १३८५८.६

तलासरी     ९३८७.२४

वाडा    १४४११.७

विक्रमगड  ७१६४.१

जव्हार  ६५८७

मोखाडा २०१५.७६

एकूण भात लागवड क्षेत्र  ७६६४४.१६

परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेल्या भातशेतात पाणी भरल्यामुळे कोंब यायला सुरुवात झाली आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व आमची दिवाळी गोड करावी. 

– काशीराम वेडगा, शेतकरी, धामटने

 सध्या ग्रामपंचायत निवडणुकींचे काम सुरू असल्याने कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. निवडणुका झाल्यानंतर पंचनामे करण्यात येतील. शेतकऱ्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधून त्यांना पंचनामे करायला सांगावेत. 

– दिलीप नेरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

भात खरेदी केंद्रावरील नोंदणीस मुदतवाढ

वाडा :  आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु या मुदतीत अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता न आल्याने ही मुदत २१ ऑक्टोबपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यात विविध केंद्रांवर शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी लवकरच सुरुवात केली जाणार आहे. खरेदीचा अंदाज येण्यासाठी गेल्या १ ऑक्टोबरपासून  खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे सातबारा, आधारकार्ड आदी कागदपत्रांची नोंदणी सुरू केली आहे.

नोंदणीचा नियम अमान्य

भात खरेदी-विक्री केंद्रावर नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्ष सातबारावर नाव असणाऱ्या व्यक्तीलाच येणे सक्तीचे केले आहे.  अनेक शेतकऱ्यांचे सातबारा हे कुटुंबातील वयोवृद्ध आई किंवा वडिलांचे नावे असल्याने  गावापासून १५ ते २० किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी ते कसे जातील असा सवाल येथील कृषी भूषण शेतकरी अनिल पाटील यांनी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना केला आहे.

सातबारावर नाव असलेल्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे ही अट काढून टाकावी, अन्यथा वयोवृद्ध शेतकरी भात विक्रीपासून वंचित राहतील. 

– शालिनी पाटील, वयोवृद्ध शेतकरी, देवळी तर्फे कोहोज, ता. वाडा