निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शहरी भागांमधील रस्ते, महामार्ग सेवा रस्तेअंतर्गत रस्ते अशा दळणवळणाच्या व वाहतूक वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या, अपघात होत आहेत. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. पशुपालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी, जव्हार अशा प्रमुख नगरपालिकांसह नगरपंचायती क्षेत्रांमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीच्या वेळी ही मोकाट गुरे फिरत असतात.  काही ठिकाणी  रस्त्यातच बसलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची दाट शक्यता निर्माण होते. स्थानिक नागरिक किंवा पोलीस आल्यानंतर ही मोकाट जनावरे बाजूला केली जातात. गाई, म्हशी, रेडे, बैल अशा गुरांचा यामध्ये समावेश आहे. ही भटकी गुरे पशुपालकांची आहेत हे सिद्ध झाले आहे. सकाळच्या वेळेस गाई, म्हशी यांचे दूध काढल्यानंतर त्यांच्यासह रेडे, बैल अशी जनावरे चरण्यासाठी पशुपालकांमार्फत सोडली जातात.

प्रमुख नगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये दुधाची मोठी मागणी असल्याने स्थानिकांसह राजस्थानकडून आलेल्या दूध व्यावसायिक परप्रांतीयांचे अनेक गोठे शहरालगत आहेत. ते सर्रासपणे आपली गुरे काम झाल्यानंतर सोडून देत असल्यामुळे या जनावरांना चरण्यासाठी रान मोकळे असते.

हिरवळीच्या शोधामध्ये ही गुरे रस्त्याच्या कडेला भटकत असतात. त्यांच्यामुळे अपघातासारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. एखादा अपघात झाल्यास या मोकाट जनावरांचे मालक त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत किंवा पोलिसांना त्यांची ओळख करणे अवघड होऊन बसते.

याच दुधाळ गुरांपासून हजारो-लाखोंचा व्यवसाय करणाऱ्या दूध व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे इतरांचा जीव धोक्यात पडत आहे. त्यामुळे अशा मोकाट जनावरांच्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी आता समोर येत आहे. दरम्यान, भटकी गुरे सोडल्यानंतर ती शहरातील व गावातील उकिरडय़ांवर व कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी चरत असतात. या ठिकाणी पडलेल्या अन्नासह प्लास्टिकच्या पिशव्या व इतर घातक घटक गुरांच्या पोटात जाऊन त्यांच्या जिवाला मोठा धोका उद्भवतो. याचा परिणाम दुधावरही होऊ शकतो व ते दूध मानवी जीवनावर दुष्परिणाम करण्याची शक्यता आहे, असे काहींचे म्हणणे आहे.

कोंडवाडय़ांचा अभाव

पूर्वी अशा मोकाट गुरांना शहरात व ग्रामपंचायतीअंतर्गत उभारलेल्या कोंडवाडय़ांमध्ये कोंडून ठेवले जायचे. पशुपालक गुरांना सोडवण्यास आल्यानंतर त्याच्याकडून दंड वसूल करून अशा जनावरांना रस्त्यावर न सोडण्याची सूचनावजा नोटीस दिली जायची. मात्र आता या मोकाट गुरांना पकडून त्यांना ठेवण्यासाठी कोंडवाडे अस्तित्वात नाहीत. तसेच अनेक ठिकाणी कारवाईसाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे, असे सांगितले जाते.

अपघातांचा धोका

पालघरच्या जुना सातपाटी रस्त्यावर अशा मोकाट गुरांमुळे वर्षभरापूर्वी धनसार येथील एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाला होता. तर महामार्गावर यामुळे विविध भीषण अपघात घडून दुचाकी व चारचाकीतील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. पालघरमध्ये  भास्कर वाडीनजीकचे गोठे, भरवाड पाडा, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आदी परिसरांतील मोकाट गुरे रस्त्यावर भटकत असल्याने माहीम वळण नाका- सुंदरम रस्ता, कचेरी रस्ता अशा ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत.

वाहतूक कोंडी व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या गुरांना मोकाट सोडणारे पशुपालक निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करू.  या गुरांमुळे अपघातादरम्यान नागरिकाचा जीव गेल्यास सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील.

प्रकाश गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर

पशुगणना

तालुका  जनावरे

वाडा    ३४४६२ 

जव्हार –       ५२०४२

मोखाडा –       २९९८०

डहाणू – ८१९३० 

पालघर –       ३८६२७

वसई – ३७३१०

तलासरी –      ३९७६३

विक्रमगड –     ३५६९०

एकूण –        ३४९८०४