वाडा तालुक्यातील शेतकरी हवालदिल
वाडा : गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने येथील शेतकऱ्यांची भात लावणीची कामे थांबली आहेत. कोरड जमिनीवर लावणी केलेली भातरोपे जमिनीला भेगा पडल्याने करपू लागली आहेत. या अवर्षण परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले असून शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे.
वाडा तालुक्यातील ९५ टक्के जमीन ही कोरडवाहू आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या येथील जमिनीत खरीप हंगामात भात हे एकमेव पीक घेतले जाते. करोनामुळे भात लावणीकरिता मजूर मिळत नसल्याच्या संकटाला येथील शेतकरी तोंड देत असतानाच ऐन लावणी हंगामातच पाऊस गायब झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. त्यानंतर रोप तयार होताच काही शेतकऱ्यांनी लावणीच्या (रोपणी) कामे हाती घेतली होती. मात्र गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची लावणीची कामे थांबली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी लावणी केली होती त्या शेतातील पाणी आटून गेले आहे. कडक उन्हाने सुकलेल्या जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. काही शेतकऱ्यांची भाताची रोपे उन्हाने करपू लागली आहेत.
पावसाची प्रतीक्षा
वाडा तालुक्यात दोन हजारांहून अधिक आदिवासी शेतकऱ्यांना सरकारने शेती करण्यासाठी वनपट्टे दिले आहेत. मात्र हे सर्व वनपट्टे कोरड (माळरान) जमिनीवरील असल्याने येथे लागवड केलेली भाताच्या रोपांनी पावसाअभावी व कडक उन्हामुळे आताच माना टाकण्यास सुरुवात केली आहे. अजून आठवडाभर पाऊस पडला नाही तर या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
कधी अवर्षण तर कधी ओला दुष्काळ या संकटाला तोंड देणाऱ्या भात उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आजवर कुठलेही सरकार ठामपणे उभे राहात नाही. -हरिश्चंद्र पाटील, शेतकरी, गारगांव, ता.वाडा