वाडा: वाडा तालुक्यासह विक्रमगड, शहापूर या तालुक्यांचा आधार असलेली वाडा ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. या ग्रामीण रुग्णालयामधील असलेला शस्त्रक्रिया कक्षामधील वातानुकूलीत यंत्रणा मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांच्या प्रसूतीची गुंतागुंत करण्याबाबतची शस्त्रक्रिया तसेच इतर नियोजित शस्त्रक्रिया रखडल्या असून ग्रामीण भागातील गोर – गरीब रुग्णांना अडचणीचा मोठा सामना करावा लागत आहे.
वाडा शहरातील ग्रामीण रुग्णालय हे आजबाजूच्या परिसरासह तीन तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे दररोज जवळपास ३५० ते ४०० बाह्यरुग्ण तर ४० ते ५० हून अधिक रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. ताप, गॅस्ट्रो, विषबाधा, अतिसार, श्वानदंश, सर्प -विंचू दंश त्याचबरोबर प्रसूतीसाठी अनेक महिला देखील दाखल होतात. येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर असूनही जागेअभावी काम सुरू होवू शकलेले नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
या वाडा ग्रामीण रुग्णालयामधील शस्त्रक्रिया कक्षामधील वातानुकूलित यंत्रणा मागील १५ दिवसांपासून बंद आहे. आजपर्यंत ही वातानुकूलित यंत्रणा चालू न झाल्यामुळे प्रसूती आणि इतर शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांना नाहक त्रास होत असून त्यांना प्रसूती शस्त्रक्रियेसाठी ठाणे, भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात अथवा तालुक्यातील इतर खाजगी रुग्णालयांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. याचा गोर -गरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंडा बरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
दरम्यान वाडा ग्रामीण रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणा बंद झाल्यापासून ग्रामीण रुग्णालयातून जवळपास १५ ते २० महिलांना प्रसूती शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या रुग्णालयात संदर्भित (पाठविण्यात) करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक आदिवासी समाजामधील गरीब कुटुंबातील महिला असून महिलांना मोठ्या प्रमाणात मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
रुग्णवाहिकांची कमतरता, वाडा- भिवंडी महामार्गाची दुरवस्था, वाहतूक कोंडी यामुळे भिवंडी, ठाणे येथील रुग्णालयात दाखल होण्यासाठी दोन तासांचे अंतराकरिता आता पाच ते सहा तासांचा वेळ लागत असल्याने हा धोका पत्करण्यास महिला तयार होत नाहीत.
मात्र असुविधेमुळे नाईलाजास्तव जवळच्या खाजगी रुग्णालयात प्रसूती करिता दाखल होत आहेत. मात्र या खाजगी रुग्णालयात प्रसूती करिता ४० ते ७० हजारांपर्यंत खर्च येत असल्याने हा खर्च गोर गरीब, सर्वसामान्य नागरिकांना खिशाला परवडणारा नाही. मात्र कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने महिलांच्या व बाळाच्या जीविताला धोका संभवत असल्याने अनेक महिला ह्या खाजगी रुग्णालयात प्रसूती करिता दाखल होत आहेत. अशा वेळी त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मात्र आरोग्याच्या उद्भवणाऱ्या मूलभूत ज्वलंत प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा महिलांचा आरोप होत आहे.
शस्त्रक्रिया करताना योग्य तापमानाची आणि हवेशीर वातावरणाची आवश्यकता असते, जी थंड आणि निर्जंतुक वातावरणातच शक्य होते.
तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे आणि औषधे योग्य तापमानाला ठेवणे आवश्यक असते. मात्र वाडा ग्रामीण रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत.
जीव धोक्यात घालून प्रसुतीची गुंतागुंत यशस्वी –
वाडा ग्रामीण रुग्णालयात दरमहिन्याला जवळपास ७० ते ९० प्रसूती होत आहेत. येथील कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षदा पाटील (स्त्री- रोग तज्ञ) यांनी सोमवार, २५ ऑगस्ट रोजी वातानुकूलित यंत्रणा पूर्णतः बंद असताना देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन महिलांच्या गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी केल्या आहेत.
या रुग्णालयात वातानुकूलित यंत्रणा बंद झाल्यापासून प्रसूती केली जात नव्हती. हि यंत्रणा बंद झाल्याने शस्त्रक्रिया कक्षात हवा खेळती राहत नसल्याने व त्यामुळे गुदमरणे अशा प्रसंगाला सामोरे जावे लागत असते.
मात्र प्रसूती करिता दाखल झालेल्या तीन महिलांपैकी दोन महिलांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे प्रसूतीची गुंतागुंत तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. कुठलाही अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. सोबतच त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये म्हणून अत्यावश्यक (इमर्जन्सी) परिस्थितीत डॉ.हर्षदा पाटील व त्यांच्या टीम यांनी आपल्या जीवाला धोकादायक स्थितीत टाकून शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शस्त्रक्रिया विभागातील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. दुरुस्त होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तो पर्यंत प्रसूतीची गुंतागुंत शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत.
वाडा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाने वातानुकूलित यंत्रणा बंद असताना ही त्यांच्याकडून कुठलीही हालचाल होत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..
तसेच वाडा ग्रामीण रुग्णालयातील बंद झालेली वातानुकूलित यंत्रणा जो पर्यंत सुरू होत नाही, व ती सुरळीत होण्यासाठी नक्की..? किती कालावधी जाईल हे निश्चितपणे किती जाईल हे सांगता येत नसल्याने तो पर्यंत गुंतागुंत प्रसूती ही करणे अशक्य असल्याने आरोग्य प्रशासनाने खाजगी किंवा संस्थेच्या रूग्णालयात किंवा अन्य पर्याय शोधून तिथे महिलांच्या प्रसूती कराव्यात. आणि त्याचा खर्च आरोग्य विभागाने उचलावा अशी मागणी वाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भोईर यांनी केली आहे.
उपजिल्हा रुग्णालयासाठी वाड्यातील एका वनविभागाच्या एक हेक्टर (२.५ एकर) जागेचा प्रस्ताव वाडा तहसीलदारांमार्फत मंजुरीकरिता पाठविला आहे. – डॉ.यादव शेखरे, वैद्यकीय अधिक्षक, वाडा ग्रामीण रुग्णालय
याबाबत वैद्यकीय अधीक्षकांकडून माहिती घेवून योग्य ती कार्यवाही केली जाईल. – डॉ.रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर