तारापूर औद्योगिक वसाहती मधील औद्योगिक विकासासोबत परिसरातील गावांमधील लोकवस्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने औद्योगिक वसाहतीवरील मोकळ्या जागेत तसेच इतर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कचऱ्याचे अनेक ठिकाणी भीग साचले असून त्या परिसरात आरोग्याची समस्या निर्माण झाल्याने साठविलेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवट लावणे आवश्यक झाले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तारापूर वसाहतीच्या सभोवतालच्या परिसरातील झपाटयाने वाढ झाली आहे. बोईसर व लगतच्या सालवड, खैरापाडा, पास्थळ, तारापूर, कोळगांव, कुंभवली, टेंभी, बेटेगांव, कोलवडे, पाम अशा १०- १२ ग्रामपंचायत मध्ये अडीच लाखापेक्षा अधिक लोकसंख्या वास्तव करत असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून दिसून आले आहे. अंदाजे अडीच लाख लोकसंख्या य परिसरात वास्तव्य करीत असून साधारणपणे १२० ते ६०० ग्रॅम प्रति व्यक्ती इतक्या प्रमाणात घनकचरा निर्मिती होत असल्याचा अंदाज बांधला तर बोईसर व परिसरात प्रतिदिन ३० ते १५० मॅट्रिक टन इतका घनकचरा निर्मित होतो.
औद्योगिक वसाहतीच्या लगत निर्मित होणाऱ्या घनकचरावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने घरगुती घनकचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. घनकचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कुजल्यामुळे दुर्गंधी बसवणे तसेच आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.ग्रामपंचायत कडून घनकचरा व्यवस्थापना विषयी हतबलता दर्शविण्यात येत असून अनेकदा साठवलेल्या घनकचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडत असतात. आगीत मूळ निर्मित हणाऱ्या धुरामुळे देखील लोकवस्तीमध्ये नागरी त्रस्त होत असल्याच्या दिसून येत आहे. घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्यासाठी तारापूर येथील काही बडे उद्योजक तसेच अणुऊर्जा प्रकल्पाच्या सामाजिक दायित्व निधीमधून मदत करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र त्याकरिता जागेची उपलब्धता नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळून पडला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात तसेच लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत साचलेल्या घनकचऱ्यावर केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार प्रक्रिया होणे आवश्यक असून यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.
सिटीझन फोरम चे प्रयत्न
सिटीझन फोरम ऑफ बोईसर तर्फे लोकआयुक्त यांच्यासमोर याचिकेद्वारे घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून लोक आयुक्त यांनी औद्योगिक परिसरात निर्मित हणाऱ्या घनकचर्याच्या व्यवस्थापनासाठी एमआयडीसीची जागा द्यावी तसेच सुसज्ज कचरा व्यवस्थापन केंद्र उभारावे असे सूचित केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने तारापूर औद्योगिक वसाहती मधील तीन जागांची निवड या कामी गेली असून एमआयडीसी ने वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत निर्णय घेणे प्रलंबित राहिले आहे. जागेची उपलब्धता झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र उभारले गेल्यानंतर बोईसर व परिसरातील गावांना भेडसवणारी ही समस्या सुटेल अशी आशा आहे.