बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणार्‍या मुख्य रस्त्यांवरील गर्दीच्या आणि अपघातप्रवण ठिकाणी बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा नियोजनाअभावी बंद अवस्थेत असून यामुळे सिग्नल यंत्रणेवर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्र परिसरातील नवापूर रस्ता आणि बोईसर चिल्हार मार्गावर प्रवास करणाऱ्या अवजड आणि खाजगी वाहनांना शिस्त लागावी तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून वर्षभरापूर्वी एमआयडीसी मार्फत खैरापाडा बिरसा मुंडा चौक, बेटेगाव टाटा हाऊसिंग, नवापुर नाका, मधुर नाका, टाकी नाका या पाच ठिकाणी ४० लाखांचा खर्च करून स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. त्यानंतर या सिग्नल यंत्रणेच्या नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा वाहतूक शाखेकडे वर्ग करण्यात आली. बिरसा मुंडा चौक आणि टाकी नाका येथील सिग्नल यंत्रणा गर्दीच्या वेळेस प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येऊन सिग्नल यंत्रणा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी वाहतूक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली.

प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेच्या यशस्वीतेनंतर सर्व पाच ठिकाणांवरील सिग्नल सुरु करण्याचे प्रयोजन होते. मात्र वाहतूक शाखेकडील मर्यादित मनुष्यबळ आणि नियोजनाच्या अभावी सिग्नल प्रणालीचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. बिरसा मुंडा चौक येथे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस सिग्नलमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडून तारापूर आणि चिल्हार दिशेला २०० ते ३०० मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागू लागल्या. यामुळे वाहन चालक आणि कामगारांना सिग्नल पार करण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा वेळ लागून कामावर आणि घरी पोचण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर अवघ्या दोन तीन महिन्यातच प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेली सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली यामुळे सिग्नल यंत्रणेवर करण्यात आलेला ४० लाखांचा खर्च वाया गेला आहे.

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये मालाची ने आण करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवजड वाहनांसोबतच खाजगी आणि प्रवासी वाहनांच्या संख्येत देखील वेगाने वाढ होत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे औद्योगिक क्षेत्राला जोडणार्‍या चिल्हार ते बोईसर, नवापुर ते बोईसर या मुख्य रस्त्यांवरील खैरेपाडा बिरसा मुंडा चौक, बेटेगाव टाटा हाऊसिंग वसाहत, नवापुर नाका, मधुर नाका, टाकी नाका या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होऊन त्याचा वाहन चालकांसोबतच कामगार आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीसोबतच बेशिस्त वाहन चालकांमुळे प्रमुख चौक आणि छेद रस्त्यांवर अपघात होऊन प्रसंगी वाहन चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत असल्याने वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून सिग्नल यंत्रणा सुरु करण्यात आली होती.

सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी जास्त होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर तारापूर बोईसर मधील सिग्नल व्यवस्था बंद करण्यात आली आहे. सुरेश साळुंखे प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा पालघर