पालघर: पालघर जिल्ह्यात १३९४  शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली झाली असून जिल्हा बाह्य तसेच विकल्प विपरीत शिक्षकांना अजूनही कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तरीही जिल्ह्यात २८ शाळांमध्ये एकही शिक्षक नसून ३३५  शाळांमध्ये प्रत्येकी एकच शिक्षक कार्यरत असल्याने शाळांमधील परिस्थिती बिकट झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये अपंग, जोडीदार अशा भाग -१ मध्ये १९०, पती-पत्नी एकत्रीकरण भाग-२ मध्ये ४७, बदलीसाठी अधिकार प्राप्त भाग-३ मधील २८३ तसेच बदलीसाठी पात्र भाग-४ मधील ८०८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील ४८६  शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. २१८ शिक्षकांच्या विकल्प विपरीत बदल्या झाल्या असल्या तरी त्यांना अजूनही पालघर जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केलेले नाही. जिल्ह्यामध्ये ७२५० मंजूर शिक्षकांची मंजूर पदांपैकी २१३२  पदे रिक्त असल्याने २८ शाळा शून्य शिक्षकी तर ३३५ शाळा एक शिक्षकी असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

रिक्त पद भरण्यासाठी राज्य शासन पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षणाची परिस्थिती बिकट झाली आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्याने ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य शासन व जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या बदल्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले आहे.

उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता

जिल्ह्यात उर्दू शाळेतील १३४  मंजूर शिक्षक पदांपैकी तब्बल ७१ पदे रिक्त असल्याने उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात उपेक्षा होत आहे. मनोर येथील उच्च प्राथमिक उर्दू शाळेत सध्या १३३  चा पट असून विद्यार्थी संख्या १५०  च्या जवळपास जाईल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत मनोर येथे फक्त एक शिक्षक कार्यरत असून नवीन शिक्षक पदांची भरती होईपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहील अशी शक्यता आहे.

जव्हार, मोखाडामध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त 

जव्हार तालुक्यात  शिक्षकांची एकूण मंजूर पदे ६९६ असून त्यापैकी ४९१ शिक्षक कार्यरत आहेत तर २०५  शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र शिक्षकांची जिल्हाअंतर्गत किंवा आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास १५ शाळा शून्य शिक्षकी शाळा होणार असून ६४ शाळा एक शिक्षकी होतील. तसेच मोखाडा तालुक्यात शिक्षकांची एकूण मंजूर पदे ५२२ असून  १६५  जागा रिक्त आहेत. बदल्या झाल्यास १३ शाळा शून्य शिक्षकी होणार असून ४१ शाळा एक शिक्षकी होतील.