कासा : वसई नजीकच्या कामण येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अधीक्षकाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवी इयत्तेत हा विद्यार्थी शिकत असून त्याला झालेल्या मारहाणीबाबत परिसरातून रोष व्यक्त होत आहे.

नितीन धनजी मागी (१४)  हा रात्रीच्या सुमारास वसतिगृहात दंगामस्ती करत होता. या कारणास्तव ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येते. अधीक्षक पृथ्वी बोरसे यांनी २ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही मारहाण केली. मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्यांला अधीक्षकांनी त्यांच्या रामपूर (वरठापाडा) डहाणू येथे घरी पाठवले. सात दिवसांपासून विद्यार्थी घरीच होता. त्याच्यावर उपचार सुरू नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती खालवली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघात यांना माहिती  मुलाची आणि कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  डहाणू प्रकल्प अधिकारी  यांनी शाळेतील जे दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

विद्यार्थ्यांला कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तपासणीनंतर विद्यार्थ्यांच्या बरगडीच्या हाडाला इजा  झाल्याने पुढील उपचारासाठी वेदांत मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे.  घटनेस बराच कालावधी उलटून गेल्याने इतर ठिकाणी दुखापत आहे किंवा नाही ते निष्पन्न झालेले नाही.  –सचिन वाघमारे, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय, कासा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटना अतिशय गंभीर असल्याने आम्ही सदर विद्यार्थी व पालक यांची भेट घेणार आहोत. तसेच दोषी अधीक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – नरेंद्र संखे, शिक्षण विस्तार अधिकारी, डहाणू प्रकल्प.