पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसात पूरपरिस्थिती निर्माण होऊन भातशेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र जिल्ह्यात कुठेही पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याची नोंद नसल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
पालघर जिल्ह्यात जवळपास ४०-४५ टक्के भात लागवड झाली आहे. म्हणजेच सुमारे ४० हजार हेक्टपर्यंत ही लागवड झाली आहे. मात्र गेल्या आठवडय़ातील मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी पूराचे पाणी साचून गोंधळ उडाला होता. भात शेतीतही पाणी जाऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती काही शेतकऱ्यांकडून मिळाली होती.

अलीकडेच काही शेतकऱ्यांनी पेरणीनंतर मोठय़ा प्रमाणात भात लागवड केली होती. त्यानंतर अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या शेतात पाणी साचून राहिल्याने भात कुजून नुकसानी होईल, अशी शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत होती. त्यानुसार कृषी विभागाने सर्व तालुक्यांच्या कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्य कार्यालयात पाठवण्यास सांगितला. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून कोणत्याही प्रकारच्या भातशेतीच्या नुकसानाबाबतचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी अतिवृष्टीमुळे कुठेही शेतीचे नुकसान झाली नसल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ऐन भात लागवडीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. दुबार पेरणीचे संकट येते की काय या चिंतेने तो चिंतित होता. सुदैवाने दुबार पेरणीचे संकट सद्यस्थितीत दूर झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. भातशेतीचे नुकसान नसले तरी खत उपलब्ध होत नसल्यामुळे तो चिंतेत आहे. खताच्या तुटवडय़ामुळे शेतकरीवर्ग आणखीन समस्याच्या गर्तेत अडकला आहे. अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले नसले तरी खत न मिळाल्यामुळे भात शेतीचे नुकसान होते की काय, अशी भीती शेतकऱ्याला आहे.