नीरज राऊत

केळव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर  ३ मार्च रोजी चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पाहता  पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य व जिल्हा प्रशासन कितीही प्रयत्न करत असला तरी  पायाभूत सुविधांचा स्तर उंचाविताना  गावात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे झाले आहे.

३ मार्च रोजी ओहोटी सुरू झाल्यानंतर पोहण्यासाठी गेलेला केळवा देवीपाडा येथील १३ वर्षीय मुलगा बुडत असल्याचे पाहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी नाशिक येथून पर्यटनासाठी आलेले चार-पाच ११वी इयत्तेचे विद्यार्थी पुढे सरसावले. कमरेभर पाण्यात आपल्याला काही धोका संभवत नाही असे गृहीत धरल्याने त्यांनी उत्स्फूर्तपणे मदतीचा हात पुढे केला असावा.

केळवा समुद्रकिनाऱ्यावर फुटकी खाडी परिसरात मोठय़ा प्रमाणात किनाऱ्याची समुद्री लाटांमुळे धूप होत असल्याने तसेच सीआरझेड क्षेत्रामध्ये बांधकाम करण्यास निर्बंध असल्याने प्लास्टिक गोणीमध्ये वाळू भरून हंगामी धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. याच बंधाऱ्याचा एक भाग म्हणून किनाऱ्यापासून ५० ते ८० मीटर अंतरावर दुसरा एक मातीच्या गोणींचा लहानसा बंधारा उभारण्यात आला होता. या बंधाऱ्याच्या उभारणीमुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये बदल होऊन बंधाऱ्याच्या समुद्री बाजूला पाण्यात भोवरा तयार होतो किंवा पाण्याचा प्रवाहाला अधिक वेग येतो. मात्र याचा अंदाज येत नाही. त्या वेळी तसेच  झाले.  बचावासाठी पुढे आलेल्या नाशिकच्या तरुणांना समुद्रकिनाऱ्यावरील बदललेल्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने अचानकपणे ते पाण्यात खेचले गेले व ओहोटीच्या पाण्यासोबत ते काही क्षणातच पाण्यात गटांगळय़ा खात बुडाले. विशेष म्हणजे मदतीला हाका मारल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळय़ा खेळांचे व टांगा सफारीसाठी कार्यरत असणारे स्थानिक पुढे मदतीसाठी सरसावले. मात्र लाइफ जॅकेट, दोर किंवा अन्य सुरक्षा साहित्य आणण्यापर्यंत विलंब झाल्याने चार तरुणांना आपल्या प्राणास मुकावे लागले.

स्वच्छता व सुरक्षा राखण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारणी करणाऱ्या केळवा ग्रामपंचायतीने ठेका दिल्यानंतर देखील ७०० ते ८०० मीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर एकही जीवरक्षक तैनात नसल्याचे सत्य पुढे आले आहे. त्याचबरोबरीने समुद्रावर पर्यटकांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी टेहळणी मनोरा सुस्थितीत नसल्याचेदेखील दिसून आले आहे. केळव्यातील या दुर्दैवी घटनेला पर्यटक जितके जबाबदार आहेत तितकेच जबाबदार ग्रामपंचायत व संबंधित ठेकेदारदेखील असून या प्रवेशशुल्क आकारणीमधून मिळालेल्या उत्पन्नातून ग्रामपंचायत नेमके काय करते, हा प्रश्न वादित आहे. या प्रकरणात दोषींविरुद्ध कारवाई झाल्यास पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत शुल्क आकारणी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अधिक जबाबदारीने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.

केळवाप्रमाणे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागातील अनेक गावांमध्ये सागरी पर्यटनाला वाव असून आठवडाअखेरीस, सुट्टी व सणासुदीच्या काळात या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत असतात. अशा परिस्थितीत धोकादायक असणाऱ्या भागाचा किंवा भोवरा येण्याची नैसर्गिक स्थिती असणाऱ्या ठिकाणी पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देण्यासाठी किनाऱ्याच्या प्रवेशाजवळ तसेच धोकादायक ठिकाणी फलक दर्शवणे गरजेचे आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर असे फलक झळकवले जातात. मात्र खाऱ्या पाण्यामुळे ते गंजणे किंवा चोरीला गेल्यानंतर पुढील अपघात होईपर्यंत ही बाब दुर्लक्षित राहाते. पर्यटकांच्या गर्दीच्या वेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किंवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून धोकादायक ठिकाणी पहारा (गस्त) ठेवणे आवश्यक झाले असून पोलिसांनी किनारा भागातील सुरक्षिततेकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.

गेल्या महिन्यात चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीने अनेकांना गंभीर जखमी केले होते व या प्रकारात एकाचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये डहाणू येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समुद्रात सफारीसाठी घेऊन गेलेली एक फेरी बोट बुडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तसेच जिल्ह्यातील वेगेवेगळय़ा घटनांमध्ये पर्यटक बुडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. याखेरीज केळवा समुद्रावर येथे साहसी खेळांच्या आयोजनादरम्यान व बाईकराईडदरम्यान लहान-मोठे अपघात होण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. सफाळे तांदूळवाडी किल्ल्याच्या जंगल भ्रमंतीसाठी गेलेल्या पर्यटक परतीचा मार्ग चुकल्याने त्यांच्याशी बचावासाठी अनेकदा शोधमोहीम घेण्याची गरज पोलीस व स्थानिकांना घ्यावी लागली होती. एकंदरीत पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधांचा स्तर उंचावणे अंतर्गत येणाऱ्या पर्यटकांना पिण्याचे पाणी, शौचालय, गाइड पुरविणे, माफक दरात खानपान सेवा उपलब्ध करून देणे, पर्यटनस्थळ परिसरातील स्वच्छता राखणे आवश्यक असून यासोबत पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

समुद्रकिनारी ओहोटी-भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करणे, समुद्रात सुरू असलेल्या प्रवाहाची माहिती प्रदर्शित कारणे, पर्यटनस्थळी काळोखाच्या यासमयी आवश्यक प्रकाशयोजना व सायरन प्रणाली कार्यान्वित करणे, समुद्रकिनारी अहोरात्र पहारा ठेवणे, जीवरक्षक व टेहळणी पथकाकडे बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षितता, बचावकार्य तसेच प्रथमोपचारबाबत प्रशिक्षण देऊन कालांतराने त्याची उजळणी करून घेणे काळाची गरज झाली आहे. एखाद्या धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणारे सूचनाफलक अधिक प्रभावी कशाप्रकारे होतील याबाबत विचारमंथन करणे आवश्यक झाले आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी समुद्रकिनारी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचाव करण्यासाठी एखादी नौका (बोट) उपलब्ध होण्यासाठीदेखील जिल्हा प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यायला हवा.

विरंगुळा- मौजमजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना संभाव्य धोक्याची माहिती प्रदर्शित करण्यासोबत अतिरेक करणाऱ्या पर्यटकांना वेळीस आवरते घेण्यासाठी देखरेख टेहाळणी यंत्रणा सक्षम केल्यास पर्यटनस्थळी होणाऱ्या दुर्घटना व अपघातांवर नियंत्रण येऊ  शकेल.