मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या तीन ते चार किलोमीटपर्यंत रांगा
कासा – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर वस्तू आणि सेवा कर पावत्यांची तसेच वाहनांशी संबंधित कागदपत्रांची आरटीओकडून तपासणी केली जात असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लहान प्रवासी कारचालकांना एक तासापर्यंत वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावे लागत आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेला महामार्ग आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली या भागांतून मुंबईकडे येणारी सर्वच वाहने या महामार्गावरूनच येतात. महाराष्ट्रात वाहनांनी प्रवेश केल्यानंतर सदर वाहनांची कागदपत्रे तपासणी तसेच मालवाहतूक वाहनांमधील मालाचे वस्तू व सेवा कर पावत्या दापचरी येथील तपासणी नाक्यावर केली जाते. परंतु सदर तपासणी करण्यास अधिकचा वेळ लागत असल्याने वाहनांच्या तीन ते चार किमीपर्यंत रांगा लागत आहेत. परंतु या वाहतूक कोंडीमध्ये प्रवासी कारधारकांना नाहक अडकून पडावे लागत आहे. तरी कारसाठी स्वतंत्र मार्गिका मोकळी ठेवावी, अशी मागणी करचालक करत आहेत.
