पालघर: तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयारीची चाचणी व तपासणी करण्याच्या दृष्टीने १४ मे रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या रंगीत तालीम च्या अनुषंगाने या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विविध शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामधून आपत्कालीन परिस्थितीत किरणोत्सर्ग (रेडिएशन) गळती झाल्यास जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय रंगीत तालीम १४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही तालीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

या तालीमेच्या पार्श्वभूमीवर ८ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अणुऊर्जा अपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तारापूर प्रकल्पाच्या १८ किलोमीटर परिसरातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रशिक्षणात पोलीस, आरोग्य, महसूल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), प्रादेशिक प्रतिसाद केंद्र पालघर, नागरी संरक्षण दल, शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत आदी विभागांतील २५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे शास्त्रज्ञ रजय पाटील यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. इंदू राणी जाखड, अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष भागडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे टीम कमांडर सुरेंद्र पुनीया, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक काशिनाथ कुरकुटे आदी उपस्थित होते.

रंगीत तालीमेचा उद्देश

अणुऊर्जा प्रकल्पात अपघात झाल्यास जनतेवर परिणाम होऊ नये म्हणून तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरण करणे व प्रशासनाच्या सर्व यंत्रणांकडून समन्वयाने मदतकार्य करणे. तसेच प्रत्येक विभागास त्यांच्या जबाबदाऱ्या समजून देणे व तत्परता वाढवणे हा मुख्य हेतू आहे.

पूर्वी या प्रकारच्या तालिम दर दोन वर्षांनी घेतल्या जात होत्या. परंतु २०२१ पासून आय सी सी आर अभ्यास दर तीन वर्षांनी केला जातो. यंदापासून दरवर्षी रंगीत तालीम घेण्याचे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार १३ मे २०२५ रोजी टेबल टॉप एक्सरसाइज होईल आणि १४ मे २०२५ रोजी राष्ट्रीय रंगीत तालीम राबविण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासन घेणार दक्षता

यापूर्वी झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या रंगीत तालमी दरम्यान निर्गमित होणाऱ्या अंतर्गत संदेश नागरिकांपर्यंत पोहोचल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी घडलेल्या या प्रकारच्या घटनांची नोंद रंगीत तालमीच्या तयारीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत घेण्यात आली असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षात घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिल्या आहेत.