पादचाऱ्यांची चालताना कसरत, चारचाकी वाहनांच्या रस्त्यावर रांगा

डहाणू : शहराकडे येणारे मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून रहिवाशांना खड्डय़ातून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात तर रस्त्याची अवस्था दयनीय असून वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथून जाताना खबरदारी घ्यावी लागत असल्याने चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग लागते. मात्र दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता डहाणूचे रस्ते पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी आहे.

डहाणू स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची संख्या प्रचंड असते. मात्र मुख्य रस्त्यावरच मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहतूकदारांना दररोज जागोजागी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मसोली, वडकून रोड, थर्मल पॉवर रोड, लोणपाडा येथे मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी बाहेर पडून तळी बनली आहेत. त्यामुळे या मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

डहाणू येथे रेल्वे स्थानक, बस आगार, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, पोलीस ठाणे, कुटीर रुग्णालय, प्राथमिक शाळा तसेच महाविद्यालय असून येथील शेकडो रहिवासी खासगी वाहने, रिक्षा, तसेच बसने प्रवास करतात.

मान्सूनपूर्व उपायांची आखणी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी पालिकेत बैठक करण्यात आली होती. रस्त्यांवरील खड्डे, नालेसफाई, धोकादायक इमारती अशा प्रमुख विषयावर पावसाळ्यापूर्वी चर्चा करण्यात आली. विविध सेवांसाठी शहरात बारा महिने रस्ते खोदले जातात मात्र खड्डे वेळीच नीट केले जात नसल्याने पावसाळ्यात त्यांच्या दुरवस्थेत व त्या अनुषंगाने नागरिकांच्या त्रासात वाढ होत असते.

रस्त्यावर पडलेल्या मोठमोठाल्या खड्डय़ांवरून चालणे जिकिरीचे झाले आहे.

– श्रीनिवास नायक, रहिवासी, डहाणू