वाडा : वाडा तालुक्यात गांजा या अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोन परप्रांतीय आरोपींना अटक केली असुन त्यांच्याकडून ६६ हजारांचा ४ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी हेमंत जामू तांडी (३१) व किशोर रामकुमार (२६) हे दोघेही सध्या वाडा तालुक्यातील खुपरी येथे प्रशांती हॉटेल लगतच्या चाळीत राहत असून त्यांचे मूळगाव ता.केसिंगा, ओरिसा राज्यातील कालाहडी जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

वाडा तालुक्यातील “वाडा – भिवंडी” महामार्गावर असलेल्या “पाहुणी पाडा” गावाच्या हद्दीत अमली पदार्थ असलेल्या गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मंगळवार, ०५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता वाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दुपारी ३:४० वा.च्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. यावेळी संशयितांची अंगझडती घेतली असता बॅगेत गांजा आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली आहे.

 पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर, सहा. फौजदार गुरुनाथ गोतारणे , पो. हवालदार विजय मढवी, केशव गायकवाड, पो.शिपाई गजानन जाधव, संतोष वाघचौरे, संजीव सुरवसे, सचिन भोये, भूषण खिलारे, कमलाकर पाटील यांनी कारवाई केली आहे.