माजी नगरसेवक व पत्रकार जावेद लुलानिया यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांनी पालघरमधील दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. दोघांनाही पालघर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पालघर व पंचक्रोशीत या दोन्ही संशयित आरोपींचा दुचाकी विक्रीचा व्यवसाय आहे. गोळीबाराची घटना झाल्यानंतर जावेद यांनी दिलेल्या जबानीमध्ये हा जीवघेणा हल्ला या दोघांनीच केल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही संशयित भावंडांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली. शनिवारी दुपारी या दोघांनाही पालघरच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयामध्ये सरकारी वकील व संशयित आरोपी पक्षाचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा अशी दाट शक्यता सरकारी वकिलांमार्फत वर्तवण्यात आली व त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर या आरोपांचे खंडन संशयित आरोपींच्या वकिलांनी केले व अनेक बाजू मांडून संशयित दोषमुक्त असल्याचे सांगून कोठडी नकारावी अशी मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे यांनी संशयित आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. जावेद लुलानिया यांच्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोटर सायकल वरून आलेल्या दोन अज्ञातांपैकी एकाने गोळीबार केला. या गोळीबारामध्ये जावेद लुलानीया जखमी झाले होते.