पालघर : पालघर शहरालगत असणाऱ्या नंडोरे या गावात डुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्युत सापळ्याला दोन तरुणांचा संपर्क झाल्याने त्यांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच बरोबरीने एक बैल विजेच्या धक्क्याने मृत पावल्याचे दिसून आले असून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
नंदोरे येथील बसवत पाड्या जवळ एका खाजगी बागायती क्षेत्रात पाण्याच्या ओढ्याच्या ठिकाणी रानडुक्कर येतील या अशाने पातळ वायरच्या मदतीने विद्युत सापळा रचण्यात आला होता. या वाडीतून वाहणाऱ्या ओढ्याच्या अवतीभवती एका विद्युत खांबावरून आकडा टाकून वीजेची वायर जमीन लगत नेऊन वीज प्रवाहने सतेज केलेल्या वायर अंथरण्यात आल्या होत्या.
हेही वाचा – बोईसर मध्ये सोमवार पासून सुरू होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे खास आकर्षण…
चिंबोरी पकडण्याच्या उद्देशाने कमलपीडी या लगतच्या आदिवासी पाड्यावरील नववी इयत्तेत शिकणारा सुजित शैलेश मस्कर (१५) व त्याचे भाऊजी दिनेश बोस (२२) हे या पाण्याच्या ओढ्याजवळ रात्री गेले असता त्यांना जबर विद्युत धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शाळेत जाण्यासाठी सुजित घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी शोधा शोध सुरू केले असता त्याचा मृतदेह या वाडीत सापडला. त्या दोघांच्या मृतदेहाजवळ एक बैलदेखील मरून पडल्याचे आढळून आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान विद्युत सापळा रस्त्याचे काम या बागायती क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या रखवालदाराच्या मदतीने केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. दोघांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर संबंधित पहारेकर्यांनी उर्वरित विजेची वायर एकत्र गोळा करून पसार होताना गावकऱ्यांनी बघितल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात चौकशी करून संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पालघर पोलिसांनी सांगितले.
रानडुकरांविरुद्ध सापळे का लावतात?
पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून त्यांच्यामार्फत शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. रानडुकरांची शिकार करण्यावर प्रतिबंध असून त्यावर उपाययोजना म्हणून बागायतदार अनेकदा आपल्या कुंपणाला विजेच्या किंवा अन्य प्रकारचे सापळे वा अडथळे रचतना दिसतात.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व डोंगराळ प्रदेशात रानडुकरांची शिकार काही प्रमाणात करण्यात येते. ज्यांना शिकार करणे शक्य होत नाही ते रानडुक्कर मारण्यासाठी अशा प्रकारचे फास व सापळे लावण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती पुढे आली आहे.