scorecardresearch

अवधनगरमध्ये अनधिकृत भंगार गोदामे; नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतरही, प्रशासनाची कारवाई नाही

बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीलगत अवधनगर भागात अनधिकृत भंगाराची गोदामे उभी राहिली आहेत.

अवधनगरमध्ये अनधिकृत भंगार गोदामे; नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतरही, प्रशासनाची कारवाई नाही
अवधनगरमध्ये अनधिकृत भंगार गोदामे

बोईसर : बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीलगत अवधनगर भागात अनधिकृत भंगाराची गोदामे उभी राहिली आहेत. सरकारी जागांवर अतिक्रमण करून उभारलेल्या या गोदामांविरोधात अनेक तक्रारी आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. तारापूर-बोईसर औद्योगिक परिसरातील सरावली ग्रामपंचायतीअंतर्गत अवधनगर, आझाद नगर, धोडीपूजा हे भाग येतात. इथे मोठय़ा प्रमाणात भंगार व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी गोदामे थाटली आहेत. या गोदामांमध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील भंगार साहित्य आणि घातक रसायनांच्या पिंपांची बेकायदा साठवणूक केली जाते.

ही गोदामे जिथे उभारलेली आहेत, ती जागा सरकारी आहे. त्या जागेवर गोदामे उभारताना कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. पालघर महसूल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर यांना तर विचारलेलेच नाही. तरीही त्या जागी पर्यावरण आणि मानवी जीवनास घातक अशा साहित्याची साठवणूक केली जाते. त्यामुळे येथे अनेकदा आगीही लागतात. असेच दुर्लक्ष केल्यास या गोदामांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करतात. या रसायनांच्या पिंपांचा स्फोट झाल्यास आजूबाजूचा परिसरही धोक्यात येईल. येथे ही रसायनांची पिंपं स्वच्छ करून त्यातून आलेले विषारी सांडपाणी कोणत्याही प्रक्रियांविनाच गटारात सोडण्यात येते. आसपासच्या रहिवाशांना या सांडपाण्याची तीव्र दरुगधी सहन करावी लागतेच शिवाय त्यांच्या आरोग्यासाठीही ते चांगले नाही. या सांडपाण्यामुळे प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक आजार पसरत आहेत. येथील रहिवाशांमध्ये विशेषत: लहान मुलांमध्ये उलटय़ा, डोळय़ांची जळजळ, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास, पोटदुखी, जुलाब असे आजार वारंवार उद्भवत आहेत.

या अनधिकृत गोदामांमध्ये मोठय़ा प्रमाणात तारापूर औद्योगिक वसाहतीमधून चोरीचे भंगार आणून त्याची विक्री केली जात असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यासाठी या परिसरात भंगार माफियांच्या अनेक टोळय़ा कार्यरत असून, महिन्याकाठी करोडो रुपयांचे व्यवहार होत असल्याचे कळते. भंगार विक्रीच्या व्यावसायिक स्पर्धेतून या टोळय़ांमध्ये हाणामाऱ्याही होतात. अनधिकृत भंगार व्यवसाय करणाऱ्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांना राजकीय पाठबळ असल्यानेच सरकारी यंत्रणाही त्यांच्यावर कारवाई करत नाही, असा आरोप रहिवासी करत आहेत.

अवधनगर परिसरातील भंगाराच्या गोदामांमध्ये मोठय़ा प्रमाणात घातक रसायनांचा साठा केल्याने आसपासच्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. भंगार व्यावसायिकांतील इर्षेतून मारमारीच्या घटनाही घडतात. आम्ही आता पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण कार्यालयामध्ये तक्रार देणार आहोत. 

– अजित संखे, भाजप कामगार आघाडी जिल्हा सहसंयोजक

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या