पालघर : पालघर जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नवसाक्षर परीक्षेच्या उपस्थितीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. कारण याच दिवशी सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे अनेक परीक्षार्थी विशेषतः महिला आणि वृद्ध व्यक्ती त्यांच्या घरातील कार्यक्रमांमुळे किंवा पितृपक्षासाठी गावी गेल्यामुळे या परीक्षेला उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) या राज्यस्तरीय परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यात एकूण २६,४५५ नवसाक्षर प्रविष्ट झाले आहेत. यात १८,०११ नवे परीक्षार्थी आणि मागील वर्षीच्या परीक्षेत गैरहजर राहिलेले किंवा सुधारणा आवश्यक असणारे ८,५२४ परीक्षार्थींचा समावेश आहे. मार्च २०२५ च्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या दीड हजारांनी वाढली आहे. तरीही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होणाऱ्या परीक्षा असल्याने ही वाढलेली संख्या प्रत्यक्षात किती प्रमाणात उपस्थित राहील, याबाबत प्रशासनालाही संभ्रम आहे.
या परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियामक परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषत्वाने नवसाक्षरांना ७/१२ उताऱ्याचे वाचन करण्याचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला, ज्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होईल.
सर्वपित्री अमावस्येचा अडथळा
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घरोघरी श्राद्धाचे कार्यक्रम असतात. त्यामुळे महिला आणि वृद्ध व्यक्ती दिवसभर घरकामात व्यस्त असतात. अनेक कुटुंबे या काळात गावीही जातात. या परीक्षांना मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे असेच वयस्कर नागरिक असल्याने त्यांच्या उपस्थितीवर या पारंपरिक सणामुळे थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा मुद्दा राज्यभर उचलला गेला होता, मात्र ही परीक्षा केंद्र स्तरावरून होत असल्याने तिच्या तारखेत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा पूर्ण साक्षर करण्याचा संकल्प
जिल्हा प्रशासनाने सन २०२७ अखेर पालघर जिल्हा पूर्णपणे साक्षर करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प केला आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जाखड़ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
मागील वर्षातील यश
मागील वर्षांच्या परीक्षांमध्ये पालघर जिल्ह्यातील नवसाक्षरांचा सहभाग लक्षणीय होता. सन २०२३-२४ मध्ये १३,३४० पैकी १२,६२३ नवसाक्षर उत्तीर्ण झाले, तर २०२४-२५ मध्ये २५,३३० पैकी २५,१६७ नवसाक्षर यशस्वी झाले. यावर्षीही परीक्षार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा साक्षरता संकल्प यशस्वी करावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने उपस्थिती किती राहील हे २१ सप्टेंबर रोजीच स्पष्ट होईल.
तालुकानिहाय परीक्षार्थींची संख्या
डहाणू – ७,३६९
जव्हार – २,४२९
मोखाडा – ७३५
पालघर – ३,९५०
तलासरी – ३,१९३
वसई – ५,३६३
विक्रमगड – १,६२८
वाडा – १,७८८