दुसरी मात्रा न घेताच प्रमाणपत्र

पालघर :  लसीकरणातील गोंधळाचे प्रकार अद्यापही सुरू असून  त्यात गोंधळाचा एक नवीन प्रकार उघडकीस आला आहे. पालघरमध्ये एका कुटुंबात लसीकरणाची दुसरी मात्रा न घेताही त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे. त्यात कुटुंबातील  मृत्यू झालेल्या सदस्यालाही हे प्रमाणपत्र मिळाले आहे. या कुटुंबातील सदस्यांनी  लशीची पहिली मात्राच घेतली होती.

पालघर तालुक्यातील घिवली येथे राहणारे हरेश्वर लोखंडे (७०), कुंदा लोखंडे (६७) तसेच रेणुका लोखंडे (७३) यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी टॅप्स रुग्णालयात लशीची पहिली मात्रा घेतली. त्यानंतर कुंदा लोखंडे आजारी होऊन त्यांचा २१ मे रोजी मृत्यू झाला तर हरेश्वर लोखंडे यांना दरम्यानच्या काळात करोना आजाराने ग्रासल्याने त्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली नाही. त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक असणाऱ्या रेणुका लोखंडे यादेखील दुसरी मात्रा घेऊ शकल्या नाहीत. असे असतानाही एका मृत ज्येष्ठ महिलेसह अन्य दोघांनी प्रत्यक्षात लशीची दुसरी मात्रा घेतल्याचे  संदेश  प्राप्त झाले. त्याच पद्धतीने या तीनही व्यक्तीला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. याविषयी पालघरचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सॉफ्टवेअरमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक अपलोड करताना तांत्रिक चुका झाल्याची शक्यता वर्तवली. संबंधित चुकीच्या झालेल्या नोंदीबाबत वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले  असून झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.